पोळ्यानिमित्त बैलांची मिरवणूक काढू नये- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगांव जिल्ह्यामध्ये दिनांक 4 ऑगस्ट, 2020 रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रकारचे राजकीय / सामाजिक / सांस्कृतिक /शैक्षणिक / धार्मिक कार्यक्रम व इतर मोठया प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच शासन परिपत्रक दिनांक 17 जुलै, 2020 नुसार सर्व जनावरांचे वाजार बंद करण्यात आले आहेत.तथापि नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाइंन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट , 2020 रोजी “पोळा” हया सणाच्या निमित्ताने जळगांव जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी बैल पूजा घरीच करावी. बैलांची मिरवणूक काढण्यात येवू नये. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज रोजी दिलेले आहे.