पोस्टाच्या नावाने बनावट वेबसाइटवरून ग्राहकांना लकीड्रॉ,बोनसची आमिषे

भारतीय टपाल खात्याच्या असे निदर्शनास आले आहे, की अलीकडील काही दिवसांपासून काही यूआरएल अथवा संकेतस्थळे व्हॉटस ॲप, टेलिग्राम, इंस्टाग्राम यासारख्या सामाजिक माध्यमांवर तसेच शॉर्ट यूआरएल अथवा टायनी यूआरएल असलेले एसएमएस /सूक्ष्म, ईमेल/एसएमएस द्वारे काही सर्वेक्षणे, प्रश्नमंजुषा प्रसारित करत असून त्याद्वारे सरकारी अनुदान उपलब्ध करून देत असल्याचा दावा करत आहेत.
आम्ही देशातील नागरिकांना कळवू इच्छितो की, सर्वेक्षणांवर आधारित अनुदान, बोनस किंवा बक्षिसे जाहीर करण्यासारख्या अशा कोणत्याही कार्यात भारतीय टपाल खात्याचा सहभाग नाही. अशा सूचना/संदेश/ईमेल प्राप्त करणार्या जनतेला विनंती आहे, की त्यांनी अशा फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांना प्रतिसाद देऊ नये.तसेच जन्मतारीख, खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, जन्मस्थान आणि ओटीपी इत्यादी कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती सामायिक करू नये,अशी विनंती देखील करत आहोत.
या यूआरएल लिंक्स/संकेतस्थळे विविध प्रतिबंधात्मक यंत्रणांद्वारे काढून टाकण्यासाठी भारतीय टपाल खाते यथायोग्य कारवाई करत आहे. जनतेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही बनावट संदेश / संप्रेषण / लिंकवर विश्वास ठेवून संपर्क करु नये किंवा त्यांना प्रतिसाद देऊ नये.
भारतीय टपाल खाते आणि पत्र सूचना कार्यालय (PIB) यांच्या तथ्य पडताळणी समूहाने सामाजिक माध्यमांद्वारे या यूआरएल/संकेतस्थळे बनावट असल्याचे घोषित केले आहे.