प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी आरक्षणात वाढीचा विचार -जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 10 : राज्यात जलसिंचनाच्या विविध प्रकल्पासाठी भूसंपादन केले जाते. अशा प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आरक्षणात वाढ करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा केली जात आहे, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घाटघर जिल्हा अहमदनगर येथील उदंचल प्रकल्पाकरीता संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उत्तर देताना श्री.पाटील म्हणाले, घाटघर प्रकल्पांतर्गत 142 प्रकल्पग्रस्तांपैकी 114 जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे.
राज्यात विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याकरीता प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले 5 टक्के आरक्षण वाढविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.