राजकीयवृत्तविशेष

प्रवाशांना एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१: राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

स्वारगेट बसस्थानक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, गुणवत्ता वाढीसाठी नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास निश्चित करणे हेच एसटीचे ध्येय आहे. याच उद्दिष्टावर आधारित प्रदूषण विरहित, आवाज विरहित ‘शिवाई’ बस आहे. नागरिकांनी निश्चितपणे या बससेवेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहीजे यासाठी सर्व सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नजीकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी आवश्यक सहकार्य करीत आहे.

एसटीवरचा जनतेचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी व्यवस्था वाढविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीने काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकुलित बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या. २०१७ मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आणि आता विद्युत घटावर चालणारी बससेवा सुरू होत असून हा महत्वपूर्ण प्रसंग असल्याचा उल्लेखही श्री.पवार यांनी केला.

शिवाई बसमध्ये वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल असे सांगून राज्य परिवहन महामंडळाच्या ७४ वर्षाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना धन्यवाद दिले. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.