बीएचआर प्रकरणी सुनिल झंवरचा मुलगा सूरजला अटक

जळगाव – बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक सुनिल झंवर आणि अवसायक कंडारे हे फरार असताना आज पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथील कोट्यवधीच्या भूखंड खरेदी प्रकरणात चौकशी कामी सुनिल झंवर याचा मुलगा सूरज झंवर याला ताब्यात घेतल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी आज त्यांच्या पथकासह सुरज झंवरला त्याच्या जळगाव येथील निवास स्थानावरून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर सुरज झंवरला घेवून आर्थिक गुन्हे
शाखेचे पथक तात्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहे. आता सूरजच्या चौकशीत आणखी काय माहिती समोर येते ही बाब महत्त्वाची असणार आहे. बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवरने नाशिक जिल्ह्यातील मांडसांगवी येथील 100 कोटींचा भूखंड अवघ्या 3 कोटी रूपयात खरेदी केलेला होता,हा खरेदी व्यवहार संशयास्पद असून यात शासनाचा कोट्यवधींचा महसुल बुडाल्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेली होती.त्यामुळे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या व्यवहाराप्रकरणी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले होते.
त्यानंतर आता मंत्रालयातील अप्पर महसुल सचिवांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे आता सुनिल झंवरच्या कायदेशीर अडचणीत प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. अशातच आता झंवरच्या मुलगा सूरजला अटक झाल्यामुळे दोघांच्या कायदेशीर अडचणीत प्रचंड वाढ झालेली आहे.आता सूरजच्या अटकेनंतर पुढे आणखी कोणत्या मोठ्या घडामोडी होतील याकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागून आहे.