भगवान बुद्धांचे चार पवित्र कपिलवस्तु अवशेष गंदन मठ परिसरातील बातसागन मंदिरात आज औपचारिक सोहळ्यात श्रद्धापूर्वक प्रदर्शित

भगवान बुद्धांचे चार पवित्र कपिलवस्तु अवशेष गंदन मठ परिसरातील बातसागन मंदिरात आज औपचारिक सोहळ्यात श्रद्धापूर्वक प्रदर्शित
भगवान बुद्धांचे चार पवित्र कपिलवस्तु अवशेष गंदन मठ परिसरातील बातसागन मंदिरातील सभागृहात आज एका औपचारिक सोहळ्यात बौद्ध मंत्रोच्चार आणि सांगीतिक प्रार्थनांच्या अत्यंत श्रद्धापूर्वक दर्शनासाठी मांडण्यात आले. या शानदार सोहळ्याला भारताचे केंद्रीय न्याय आणि कायदा मंत्री किरेन रिजिजू, मंगोलियन संसदेचे अध्यक्ष झानदानशातर गॉंबोजाव, मंगोलियाचे सांस्कृतिक कार्य मंत्री खांबा नोमुन खान यांच्यासह अन्य संसद सदस्य तसेच मोठ्या संख्येने लामा आणि भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज मंगोलियात आयोजित या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक देखील उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, अनेक शतकापूर्वी भारतातून हिमालय पर्वतरांगा ओलांडत बौद्ध धर्म मंगोलियाच्या विस्तृत भागात प्रसारित झाला आणि त्यामुळे तो दोन्ही देशांचा मौल्यवान सामायिक वारसा बनला या अध्यात्मिक दुव्याने दोन्ही देशांतील लोकांना नेहमीच एकमेकांशी बांधून ठेवले आहे,असेही रिजिजू म्हणाले. गंदन मठात भगवान गौतम बुद्धांच्या भारतीय अवशेषांसह मंगोलियन अवशेषही मांडण्यात आले असून यामुळे बंधुभाव असणाऱ्या भारत आणि मंगोलिया या देशांमधील अद्वितीय अध्यात्मिक बंध आणखी दृढ होतील विश्वास त्यांनी व्यक्त केला.


द्वेष आणि हिंसेला आपल्या विचारांमध्ये किंचितही स्थान मिळणार नाही यासाठी प्रार्थना करूया, असे किरेन रिजिजू म्हणाले. जगात नेहमीच शांतता, करुणा आणि सद्बुद्धी यांचा विजय होवो, बुद्धाचे तत्वज्ञान आणि शिकवण यातून जगातील लोकांना आपले दुःख आणि कष्ट दूर करण्याचा मार्ग मिळावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.


या कार्यक्रमात बोलताना मंगोलियन संसदेचे अध्यक्ष झानदानशातर गॉंबोजाव यांनी मंगोलियात भगवान बुद्धांच्या अवशेषांचे अकरा दिवस प्रदर्शन मांडून मंगोलियातल्या लोकांना बुद्धाने प्रती आपला आदर व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून देण्याची संधी दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले.
