राजकीय

भाजपाचे आमदार फोडण्याचा फाॕर्म्युला मुंबईत तयार? सुरवात भुसावळातून ?

मुंबई – हिवाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्ष संघटना विस्तारासाठी मोठी रणनीती आखलेली असून यामुळे राज्यासह उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या रणनीतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हावर पुन्हा निवडून त्यांची “घरवापसी” करून आणण्याबाबत जोरदार खलबते सुरू झालेली आहे.
या फाॕर्म्युल्याची “बोहणी” एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून एकनाथराव खडसे यांचा प्रभाव असलेल्या भुसावळ विधानसभा मतदार संघातून ‘लिटमस टेस्ट’ घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे आग्रही असल्याची चर्चा झाल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.


अनेक माजी आमदारांची कूच ‘महाविकास आघाडी’कडे
राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपचे काही माजी आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील झालेले आहेत. त्यात काही शिवसेना, तर काही काँग्रेसमध्ये गेलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरूच आहे. माजी मंत्री जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, बीड येथील माजी आमदार व ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यातच आता कोल्हापूर येथील माजी आमदार राजू आवळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.


पहिली “लिटमस टेस्ट” भुसावळात ?
या राजकीय फॉर्म्युल्याची ‘लिटमस टेस्ट’ भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदार संघात करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भुसावळ मतदारसंघात विद्यमान आमदार संजयभाऊ सावकारे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आहेत. मात्र ते खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, प्रसिद्धी माध्यमात देण्यात आलेल्या जाहिरातीत केवळ खडसे यांचाच फोटो होता , तसेच या जाहिरातीमधून “कमळ”ही गायब झालेले होते. तसेच भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नसल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्यभर सुरू झालेली होती. मात्र आमदार सावकारे यांनी या पक्षांतराच्या चर्चांना नकार दिलेला आहे. आमदार संजयभाऊ सावकारे हे 2014 च्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच त्यांना राज्यमंत्रिपद दिले होते. तरीही खडसे यांनी आमदार सावकारे यांना भाजपमध्ये खेचून आणून निवडून आणण्यास मोलाची भूमिका बजावलेली होती. त्यामुळे एकनाथराव खडसे हे आमदार संजयभाऊ सावकारे यांना आता पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याच्या तयारीला लागलेले आहेत. परंतु आमदार सावकारे हे खडसेंनी सांगितल्यास राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून तसे झाल्यास आमदार सावकारे यांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नव्या रणधुमाळीची लवकरच नांदी होण्याची शक्यता या घडामोडींमुळे व्यक्त होत आहे. खडसेंच्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय उलथापालथीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.