जळगाव – जळगाव तालुक्यातील भादली बुद्रूक ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बरांना आव्हान उभे करणाऱ्या अंजली पाटील यांनी दणदणीत आणि ऐतिहासिक विजय मिळविलेला असून त्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनलेल्या आहेत.जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील ऊर्फ अंजली जान गुरू संजना जान यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज जळगाव तहसील कार्यालयाने नाकारल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. उच्च न्यायालयाकडून त्यांना महिला वर्गवारीत उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभलेले आहे. आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या 560 मते मिळवून विजयी झालेल्या आहेत. त्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. भादली गावातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अंजना पाटील यांनी सांगितले.
