
वाराणसी इथे सुरु असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय शिक्षा (शिक्षण) समागमाचा आज समारोप झाला. या परिषदेत, सर्व शिक्षणतज्ञ आणि नेत्यांनी, भारताला समानतेवर आधारित चैतन्यमय ज्ञानयुक्त समाज बनवण्यासाठी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला.
‘आपल्या विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज करायचे असेल तर प्रागतिक, प्रतिसादात्मक, जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था निर्माण करण्याची गरज आहे,’ असे मत, या समारोप प्रसंगी बोलतांना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. तसेच अशा उच्चशिक्षण संस्थांमध्ये, सर्वांना प्रवेशाची संधी, समावेशकता , समानता, सर्वांना परवडणारे शिक्षण आणि गुणवत्ता या बाबी असतील याची आपण खातरजमा करायला हवी, असेही ते पुढे म्हणाले.
भारतीय तत्व, विचार आणि सेवाभाव यावर आधारीत बदल घडवून आणणारी शिक्षण प्रणाली आपण अमलात आणलीच पाहिजे, असे प्रधान म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आपले शिक्षण वसाहतवादाच्या विळख्यातून सोडविण्याची, आकांक्षापूर्ती करण्याची, आपल्या भाषांचा, संस्कृती आणि ज्ञानाचा अभिमान निर्माण करण्याची दिशा आणि मार्ग दाखवला आहे, असे ते म्हणाले.
या तीन दिवसांत सर्व विद्वान, धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ञांचा उत्साह बघता, एक नवीन आत्मविश्वास, एका नव्या उर्जेचा संचार झाला आहे. हा शिक्षण समागम म्हणजे भारताला ज्ञानाधारित महाशक्ती म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक पाउल आहे, असे प्रधान म्हणाले.
भारताचा, संशोधन आणि नवोन्मेष केंद्र म्हणून विकसित करण्याच्या आणि हवामान बदल, कचऱ्यातून संपत्ती बनविण्याचे तंत्रज्ञान निर्मिती आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या सल्ल्याचा प्रधान यांनी पुनरुच्चार केला. देशातील विद्यापीठे उद्यमशील समाज आणि नोकऱ्या तयार करणारे बनविण्यात मोलाची भूमिका बजावतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या भाषणात केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष सरकार म्हणाले, सर्वंकष शिक्षण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आत्मा आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, ‘भारतीय भाषांमध्ये शिक्षण’ यावर खूप भर देण्यात आला आहे. मात्र, आपल्या भाषांमध्ये जागतिक दर्जाच्या अध्ययनाची साधने उपलब्ध नाहीत, असे मत, केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात 11 सत्रे आयोजित करण्यात आली, ज्यात 9 संकल्पनांवर आधारित सत्रे आणि दोन सत्रे खास शिक्षणक्षेत्राची यशोगाथा सांगण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या सर्वोत्तम पद्धतींच्या अंमलबजावणीविषयी होती.
शिक्षण मंत्रालयाने 7 ते 9 जुलै दरम्यान शिक्षा समागम या परिषदेचे वाराणसी इथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मान्यवर शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते आणि शैक्षणिक नेत्यांना आपले अनुभव सांगण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या आराखड्यावर चर्चा करण्यास मंच उपलब्ध करून देण्यात आला. या कार्यक्रमात 300 शैक्षणिक, प्रशासकीय आणि विविध विद्यापीठांतले (केंद्रीय, राज्य, अभिमत आणि खाजगी), तसेच तसेच देशभरातील राष्ट्रीय महत्वाच्या संस्था (आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयएसईआर) अग्रगण्य तज्ञ सहभागी झाले होते.