राष्ट्रीय

भारत सरकारच्या 53 मंत्रालयांमध्ये सर्वाधिक 200 अधिकारी मराठी, मराठी बाणा!!

नवी दिल्ली, दि. २५ : देशात प्रशासकीय सेवांमध्ये मराठी अधिका-यांचा टक्का वाढत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचा वारसा पुढे घेवून जात हे अधिकारी महाराष्ट्राची ध्वजा अभिमानाने उंचावत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना ‘ प्रशासकीय सेवेतील मराठी माणूस’ या विषयावर डॉ. मुळे बोलत होते.
गेल्या काही दशकांमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून गुवाहाटीपर्यंत मराठी अधिकारी संपूर्ण  देशभर कार्यरत आहेत. राजधानी दिल्लीतही विविध मंत्रालयात महत्वाच्या पदांवर मराठी अधिकारी महत्वपूर्ण कामगिरी करीत आहेत. केंद्र शासनानाच्या विविध आयोगांवर व संस्थांमध्येही  महत्वाची पदे भूषवित आहेत. हे सर्व अधिकारी महाराष्ट्राचे राजदूत असून त्या-त्या राज्यात तसेच राजधानी दिल्ली मध्ये महाराष्ट्राचा प्रभाव पाडत आहेत, हे आश्वासक चित्र असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
देशाच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत हे सर्व अधिकारी महाराष्ट्राचा सामाजिक,ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा पुढे घेवून जाण्याचे  कार्य जोमाने करीत आहेत. केंद्र सरकारमधील महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे कार्यरत मराठी अधिका-यांसह येथील एकूण ५३ मंत्रालयांच्या विविध विभागात आपल्या ज्ञानाची व कौशल्याची छाप या अधिका-यांनी सोडली आहे. दिल्लीमध्ये अशा २०० हून अधिक अधिका-यांनी एकत्र येत ‘पुढचे पाऊल’ ही संस्था स्थापन केली आहे. हे अधिकारी ‘खासदार मित्र’ ही संकल्पना दिल्लीत राबवित आहेत. बहुतांश अधिकारी आपल्या जबाबदा-या सांभाळून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या तयारीसाठी येणा-या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विविध मंचांच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.
डॉ. मुळे यांनी यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तामीळनाडू,मध्यप्रदेश,ओडिशा,छत्तीसगड या राज्यांसह केंद्रशासीत  प्रदेशात  प्रशासकीय सेवेत मराठी अधिकारी करीत असलेले उल्लेखनीय कार्य व त्याला स्थानिक जनतेकडून मिळत असलेली कौतुकाची थाप यावरही प्रकाश टाकला. तामीळनाडूचे राज्यपाल आणि त्यांच्या ताफ्यातील सर्व महत्वाच्या पदांवर कार्यरत अधिका-यांच्या कार्याने अन्य राज्यांसमोर आदर्शवत चित्र उभे केले असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या अन्य भागांप्रमाणेच इशान्येकडील राज्यातही प्रशासकीय सेवांमध्ये मराठी अधिकारी प्रभावीपणे कार्य करीत आहेत.आपल्या सेवेच्या माध्यमातून हे अधिकारी कर्मभूमी आणि जन्मभूमी यांना सांधणारा दुवा म्हणूनही कार्य करीत आहेत. नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगली अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाला खंबीर नेतृत्व देत सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे अधिकारी व त्यांचा त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडून झालेला सन्मान व कौतुकाचे अनेक उदाहरण असल्याचे डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीसह अन्य राज्यातील प्रशासकीय सेवेत कार्यरत मराठी अधिका-यांनी त्या-त्या राज्यांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून जन्मभूमीशी नाळ कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. राज्या बाहेर प्रशासकीय सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील या सर्व अधिका-यांनी आपआपल्या जन्मभूमीत आणखी नवनवे प्रकल्प राबवावे अशी अपेक्षाही डॉ. मुळे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने राज्यातील वेगवेगळया भागात स्थापन केलेल्या नागरी परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधून या अधिका-यांनी  रिसोर्सपर्सन म्हणून मदत करण्याची आवश्यकता असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. नुकतेच महाराष्ट्र शासनाने उच्चाधिकार  समिती नेमली असून या समितीद्वारे पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे यातही या अधिका-यांनी आपले योगदान दयावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्याबाहेर कार्यरत हे सर्व मराठी अधिकारी एकत्र आले तर महाराष्ट्र सर्वांगिण उन्नतीचे केंद्र बनेल. तसेच अन्य राज्यांना निश्चितच आपले अनुकरण करावे वाटेल. या संपूर्ण प्रवासात मराठी अधिका-यांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.