शासन निर्णय

भुसावळच्या लता बनसोले यांना शौर्य पुरस्कार जाहीर, रेल्वे प्रवाशाचे वाचवले होते प्राण

कल्याण- लता बनसोले या एमएसएफ महिला जवानाने 26 डिसेंबर 2020 रोजी कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॕटफाॕर्मवर लोकल समोर पडलेल्या एका व्यक्तीचे प्रसंगावधान दाखवून
प्राण वाचवले होते. ही व्यक्ती अचानक चक्कर येऊन पडली होती. लता बनसोले यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे रुळावर धाव घेऊन लोकल थांबविली आणि प्रवाशांच्या मदतीने त्या इसमाला उचलून रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार करून दिले.जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडलेल्या लता बनसोले यांच्या या धाडसाची दखल घेत शासनाने त्यांना अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा शौर्य पुरस्कार जाहीर झालेला आहे.
लता बनसोले या सध्या बदलापूरमध्ये रहिवास करीत असल्या तरी त्यांचे बालपण जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये गेलेले आहे. पॉलिटिकल सायन्स या विषयात एमएची पदव्युत्तर पदवी घेतलेल्या लता यांच्या घरापासून जवळच भुसावळ पोलीस चौकी होती. काही कामानिमित्त दररोज या पोलीस चौकीसमोरून ये जा करताना त्यांच्या मनात लहानपणापासूनच पोलीस होण्याची इच्छा जागृत झाली.
सर्व प्रथम 2014 मध्ये त्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला मात्र त्यात त्यांना अपयश आले . मात्र तरीही त्यांनी खचून न जाता प्रयत्न सुरुच ठेवले. यानंतर 2015 मध्ये त्यांचे निरंजन यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतरही त्यांचे वास्तव्य भुसावळमध्येच होते. याच दरम्यान त्यांना मुलगा देखील झाला.अखेर दोन वर्षांनी 2017 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आज लता बनसोले यांना मिळालेल्या शौर्य पुरस्कारामुळे समस्त भुसावळकरांना नक्कीच अभिमान वाटेल.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.