भुसावळच्या विकासासाठी 76 कोटींचा निधी मंजूर- ना.गुलाबराव पाटील

भुसावळ- नाशिक विभागातील एकमेव “अ” दर्जा प्राप्त असणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या भुसावळ शहरातील प्रलंबीत विकासकामांबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मॕरेथाॕन आढावा बैठक घेतली. या बैठकीत तब्बल 76 कोटी रूपयांच्या कामांबाबत सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन अखर्चित निधीचा तात्काळ विनियोग करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा विश्रामगृहात भुसावळ नगरपालिकेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी भुसावळचे आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
भुसावळातील रस्त्यांचे भाग्य उजाळणार
भुसावळ नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान योजनेत 17 कोटींचा निधी प्राप्त झालेला होता,परंतु यात सप्टेंबरपर्यंत एक रूपयाही खर्च झालेला नव्हता. आता या निधीच्या खर्चासाठी तात्काळ मान्यता घ्यावी असे निर्देश ना.पाटील यांनी दिले. तसेच यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून 7.63 कोटींच्या विकासकामांना परवानगी मिळाली असून उर्वरित
प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
तसेच भुसावळ नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून 12 कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी मिळालेली होती. यात सप्टेंबर 2020 पर्यंत एक दमडीही विकासकामांवर खर्च झालेला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे या कामांसाठी आठ दिवसात आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.तसेच नगरपालिका हद्दीतील सौंदर्यीकरण पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण व अन्य कामे यातून करण्यात येणार असून याला लगेच प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री ना.पाटील यांनी दिले. तसेच सर्वच कामांचा दर्जा उत्तम कसा राहिल यावर लक्ष्य ठेवण्याची तंबी ना.पाटील यावेळी दिली.
तसेच याप्रसंगी भुसावळ नगरपालिकेच्या 46 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीपश्चातची तब्बल 4 कोटी 30 लाख रूपयांची देणी गेल्या 9 वर्षांपासून प्रलंबीत होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशामुळे या सर्वांना आजच ही रक्कम धनादेशाच्या स्वरूपात प्रदान करण्यात आली. यावेळी पेंशनर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले.
तसेच भुसावळकरांसाठी पाणी हा सर्वात महत्वाचा ज्वलंत मुद्दा आहे. जे सत्ताधारी भुसावळकरांना वेळेत पाणी देत नाहीत त्यांना यावेळी जनता निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,असे रोखठोक विधान पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. तसेच शहरात कासवगतीने सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाला वाढीव निधीची आवश्यकता भासत असल्याचा मुद्दा याप्रसंगी चर्चेत समोर आल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यात आली. पूर्वीची मूळ अमृत योजना ही 90 कोटींची होती. त्यानंतर यासाठी 158 कोटींची वाढीव तरतूद करण्यात आली. परंतु आता यासाठी एकूण 214 कोटी रूपयांच्या नवीन निधीची आवश्यकता भासणार आहे. या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने तात्काळ नवीन आराखडा मान्यतेचा प्रस्ताव हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवावा. तेथून नाशिक येथील सीओंकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश ना.पाटील यांनी यावेळी दिले. या संदर्भात आपण तातडीने मंत्रालयात बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, अमृत योजना कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यमान पाणी पुरवठा योजना व नूतनीकरणासाठी अडीच कोटी रूपयांची तरतूद करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी याप्रसंगी दिले.