भुसावळातील विकासकामे सुरू न केल्यास वठणीवर आणेल- ना.गुलाबराव पाटील
भुसावळ- आज भुसावळ शहरात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या दोन शाखांचे उद्घाटन केले.त्यातील एक जुना सातारा भागात माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील केले.तसेच भुसावळ नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात करत कोट्यवधींचा निधी पडून असून सुद्धा रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची विकासकामे सत्ताधारी करत नसून जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी केला. भुसावळात विकासकामे न करणाऱ्यांवर येत्या काळात कडक कारवाईचे आव्हान वजा इशारा ना.पाटील यांनी दिल्याने नगरपालिका सत्ताधारी व अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. ना. पाटील हे आता दर पंधरवाड्यात भुसावळच्या विकासकामांचा आढावा घेऊन हिशोब घेणार असल्याने मंजूर असलेल्या कामांचे कार्यारंभ आदेश मिळूनही विकासकामे न करणाऱ्या ठेकेदारांचे प्रचंड धाबे दाणाणले आहे. तसेच भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत येथे तात्काळ एक आयपीएस दर्जाचा अधिकारी देण्यात आल्याची माहिती ना.पाटील यांनी दिली. मागील वर्षी बियाणी स्कूल येथे भाजपचे काही नगरसेवक व भुसावळातील काही शिवसैनिकांनी तेव्हा पालकमंत्री झाल्यानंतर ना.गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार केलेला होता.त्यावेळी ते “मी पुन्हा येईन” पण शिवसेना पक्षविस्तारासाठी आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी असा संदेश दिलेला होता. त्यानंतर आज भुसावळात शिवसेना शाखा उद्घाटनच्या निमित्ताने शिवसेनेची पहाडी आवाजाची मुलुख मैदानी तोफ पुन्हा धडाडली. यावेळी नामदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.आगामी काळात नगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात शिवसेनेला नवसंजीवनी आणि पक्षविस्तार आणखी वाढविण्यासाठी आणि नगरपालिकेतठ शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर चोपड्याच्या आमदार सौ.लताताई सोनवणे, माजी जिल्हा प्रमुख ॲड जगदिश कापडे, माजी नगरसेवक दीपक धांडे,उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख नीलेश महाजन,शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे तसेच रेल कामगार सेनाध्यक्ष ललीत मुथा व पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आजीमाजी जि.प. व पं.स. सदस्य व शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, ज्येष्ठ शिवसैनिक तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.