भुसावळातून रेकॉर्डवरील दोन हिस्ट्रीसिटर गुन्हेगार तडीपार

भुसावळ दि:3 नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वात पोलिस प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून कंबर कसलेली असून वारंवार गुन्हे करणार्या रेकॉर्ड वरील हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांची कुंडली तयार केलेली आहे. भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेला वारंवार बाधा आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा उगारत त्यांच्यावर भुसावळ शहरातील शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून किमान एक वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव गेल्यावर्षी पाठविण्यात आलेला आहे. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांचे कोर्टात अशा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपारीच्या कारवाईचे आदेश आज निर्गमित करण्यात आलेले आहे.
भुसावळ शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर खाकीचा वचक कायम राहण्यासाठी व भुसावळ शहर हे गुंडापासून भयमुक्त करण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणे पोलीस प्रशासनाला आवश्यक बनलेले आहे. पोलीस प्रशासनाने आणखीही काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीच्या फाईल्स उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्याकडे पाठविलेल्या असून त्यांचेवर निर्णय होणे अजून बाकी आहे.
भुसावळ शहरातील गणेश रमेश कवडे रा.गामाडिया प्रेस,भुसावळ या सराईत गुंडावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी त्याला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेलं आहे. तसेच राहुल नामदेव कोळी रा.मरीमाता मंदिराजवळ जुना सातारा,भुसावळ याचेवर सुद्धा चार गंभीर गुन्हे असल्याने यालासुद्धा दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश आज काढलेले आहे. यापूर्वीही अनेक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झालेली असून सातत्याने सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई होत असल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडालेली आहे.