भुसावळात गॕस सिलिंडरच्या “मापात पाप”,ग्राहकांची लूट
भुसावळ- काल दिनांक 6 जानेवारी रोजी पापा नगर भागातील उदय गॅस एजन्सी च्या मार्फत ग्राहकांना मिळणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये तफावत असल्याची तक्रार एका ग्राहकाने तहसीलदार यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार दीपक देवरे यांनी त्यांच्या पथकाला पापानगरातील उदय गॕस एजन्सीच्या संबंधित घटनास्थळी पाठवून चौकशी केली असता एजन्सीच्या मालवाहतूक रिक्षात असलेल्या आणि ग्राहकांना घरपोच पुरवठा करणाऱ्या गॅस सिलेंडरची वजन काट्यावर मोजणी केली असता त्यातील आठ सिलिंडरमध्ये दोन ते तीन किलोची तफावत असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या उदय गॅस एजन्सीने “मापात पाप” केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहे.त्यामुळे या गॅस एजन्सी वर परवाना रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भुसावळचे तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी,जळगाव यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे. आधीच गॕस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडून सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असताना या घटनेमुळे भुसावळातील गॅस सिलेंडरमधील गॕस चोरून ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर पुरवठा करून ग्राहकांची लूट होत असून काही ठिकाणी “मापात पाप”होत असल्याचे या घटनेमुळे समोर आलेले आहे. तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाने अचानक तपासणीचे अभियान राबवण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.