भुसावळात लवकरच वेळोवेळी कोम्बिंग आॕपरेशन्स राबवू-SP डाॕ प्रविण मुंढे
भुसावळ-काल रात्री भुसावळ शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलेली असून यात पुन्हा गावठी कट्टाचा वापर करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून भुसावळात गावठी कट्टे पकडण्याचे सत्र सुरू आहे. भुसावळ शहरात काही तरुणांमध्ये हौसेखातीर गावठी कट्टे वापरण्याची क्रेझ निर्माण झालेली आहे. यातून नवगुन्हेगार तयार होत असून अनेकदा गोळीबार आणि खूनाच्या घटना घडलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी पाडे आणि उमर्टी या ठिकाणी अवैध शस्त्र निर्मिती कारखाने असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. याच ठिकाणांहून भुसावळ शहरात वेगवेगळ्या मार्गाने गावठी कट्टे आल्याचे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुन्हेगारांकडे गावठी कट्टे आढळून येत असल्याने हा खूप मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. मात्र या अवैध शस्रांचे मुख्य पुरवठादार व तस्कर अजूनही पोलिसांच्या हाती लागल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे मुख्य सूत्रधारांना पकडून या अवैध शस्त्र तस्करांची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन नियोजन करत आहे. आज भुसावळ येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॕ प्रविण मुंडे यांनी काल गोळीबार झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच भुसावळ शहरात येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीत वेळोवेळी मोठ्याप्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन्स राबवून भुसावळातील गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.तसेच भुसावळची गुंडगिरी लवकरच उखाडून फेकू असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी आज केलेले आहे.