भोंगे लावणे किंवा उतरवणे ही सरकारची जबाबदारी नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई दि:20 भारतातील कोणत्याही कायद्यामध्ये धार्मिक स्थळी भोंगे लावणे किंवा उतरवणे हे सरकारचं काम नाही,तथा सरकारची जबाबदारीही नाही. ज्याला लाऊड स्पीकर लावायचा आहे, त्याला पोलिसांची परवानगी घेऊनच लावता येईल.तसेच सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स त्यांना फॉलो कराव्या लागतील. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”नियमांचे पालन करून विशिष्ट डेसिबल आवाजापर्यंतच लाऊड स्पीकर लावता येतील,अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत राज्य सरकारची भूमिका आज स्पष्ट केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवल्याने राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“राज्यात भोंग्यांच्या संदर्भात नवा प्रश्न उभा ठाकला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालकांना आढावा बैठक घेण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल बैठक घेतली. या बैठकीतला रिपोर्ट त्यांनी मला दिला. येत्या काही काळात राज्यात जी परिस्थिती उद्भवू शकते, यावर आमची सविस्तर चर्चा झाली. राज्यात सध्या जातीय क्लेष निर्माण करण्याचं काम काही जण करत आहेत. त्यांच्याविरोधात कडक अॅक्शन घेण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत”, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
“कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकार अशा समाजकंटांविरोधात गंभीर आहे. आमची सरकारतर्फे विनंती आहे की कायदा कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. संघर्ष वाढवू नका. तेढ निर्माण करु नका. आणि अशा प्रकारची कृती कुणाकडूनही झाली तर कठोर कारवाई करण्यात येईल”, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिलेला आहे.