वृत्तविशेष

‘मधाचे गाव’ महाबळेश्वरचे मांघर

महाबळेश्वरला फिरायला गेलात की तुमची ही भेट आता ‘गोड’ आठवण देणारी ठरणार आहे. इथे येणारे लाखो पर्यटक मांघर या गावाला भेट देऊन येथील मधपाळांनी संकलित केलेला शुद्ध मध चाखू शकणार आहेत.

जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर ‘मधुपर्यटन’ही संकल्पना रुजावी या मुख्य उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाने ‘मधाचे गाव’ ही संकल्पना साकारण्यासाठी मांघर हे मधाचे गाव तयार केले आहे. हे देशातील पहिले मधाचे गाव ठरले आहे.

मधमाशांची घटती संख्या संपूर्ण सजीव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांसाठी घातक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांचे कार्य अनन्यसाधारण असेच आहे. आज जागतिक स्तरावरदेखील मधमाशांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.

मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील साठ वर्षांपासून मधमाशा पालनासंदर्भात कार्यरत आहे. 1957 साली मध संचालनालयाची स्थापनादेखील महाबळेश्वरला करण्यात आली आहे.

मांघर ठरले पहिले मधाचे गाव

‘मांघर’ या महाबळेश्वर तालुक्यातील गावाची निवड ‘देशातील पहिले मधाचे गाव’ म्हणून करण्यात आली आहे. मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोक मधमाशीपालन करीत आहेत. या गावाच्या आजूबाजुला घनदाट जंगल असून वर्षभर राहणारा फुलोरा आहे. या गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या गावात निवडणूक झाली नाही. सुंदर व स्वच्छ असणाऱ्या या गावात मधमाशांमुळे समृद्धी आली आहे. या सगळ्याचा विचार करुन मांघर गावची निवड करण्यात आली आहे.

या गावात सामूहिक मधमाशांचे संगोपन केले जात आहे. प्रत्येक ग्रामस्थाकडे कमीत कमी दहा मधमाशांच्या पेट्या आहेत. मधमाशांपासून मध मेण व इतर उत्पादने तयार करण्यासाठी या गावात मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. संकलित केलेला मध गावच्या ब्रँडने विकला जाणार आहे.
गावात मधमाशांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार असून संपूर्ण गाव मधमाशांच्या विविधतेने सुशोभित केले जात आहे. मधमाशांच्या माध्यमातून गावातील शेतीला सेंद्रीय प्रमाणीकरण करून आणि लोकांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजना मांघर गावात प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. नुकतेच वन विभागाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली.

शेतीपिकांवर दिवसेंदिवस वाढत असलेली रासायनिक कीटकनाशके आणि खते यांच्या प्रभावाने मित्रकिडी आणि मधमाशांसारखे कीटक नाश पावत आहेत याबाबतची जनजागृती करण्यासाठी मधाच्या गावाचे नियोजन केले आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यातही तयार होतील मधाचे गाव

‘मधाचे गाव’ ही संकल्पना केवळ मांघरपर्यंत मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्ह्यातदेखील राबविण्यात येणार आहे. मधमाशांच्या पर परागीकरणामुळे शेतीपिक उत्पादनात भरघोस वाढ होत असते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळण्यासाठी ‘मधाचे गाव’ हे मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आहे.

मध संचालनालयाच्या वतीने मांघर हे गाव आता मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मधमाशी संवर्धनाबरोबरच निसर्ग संवर्धनाचा प्रकल्प लोकाभिमुख होईल.
असे साकारले मधाचे गाव…
मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची निवड करणे हा अत्यंत महत्वाचा भाग होता. या गावाची निवड करताना अनेक बाबींची काळजी घेणे आवश्यक होते. गावाची भौगोलिक रचना, गावातील लोकांचे व्यवसाय, या संकल्पनेसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती आणि अशा अनेक बाबींची पूर्तता होणे गरजेचे होते. राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर एका गावाची निवड करण्यात आली.
मधाचे गाव साकारण्यासाठी महाबळेश्वर येथील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे. मांघर हे गाव महाबळेश्वरपासून 8 किलोमीटर अंतरावर डोंगरकड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते. मांघर या गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करते.
मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहिले जाते. मधमाशांच्यामुळे पीक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.
बहुगुणी मध
मधाचा उपयोग अन्न पदार्थासह औषधी म्हणून देखील केला जातो. भारतातील मधाला जगभरातून प्रचंड मागणी आहे. नियमित मध आणि लिंबू सेवन केल्याने वजन कमी करण्यापासून तजेल त्वचेपर्यंतचे अनेक फायदे होतात. लिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मधामध्ये ॲन्टीबॅक्‍टेरिअल तत्त्वे असतात. ही तत्त्वे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात. लिंबू आणि मध यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया चांगली होते. मध रोज खाल्याने त्वचेवर संक्रमणाचा आणि ॲलर्जीचा धोका कमी होतो. वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट्‌स असतात. ही खाल्याने शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो. मध आणि लिंबूमध्ये असलेली ॲन्टिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.