मध्य प्रदेशात शिकाऱ्यांशी चकमक,गोळीबारात 3 पोलीस ठार

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात शिकाऱ्यांसोबत झालेल्या चकमकीत शनिवारी पहाटे आरोन पोलिस स्टेशनशी संलग्न असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिसांचा मृत्यू झाला. यामुळे मध्यप्रदेशात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
ही घटना गुना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 55 किमी अंतरावर सागबरखेडी गावाजवळ घडली. जिथे हेड कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम मीणा हे चारचाकी वाहनासह नियमित ड्युटीवर तैनात होते. त्यांचे वाहन लखन गिरी नावाचा खाजगी चालक चालवत होता.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी शिकारींना पोलिसांनी घेरले असल्याचे समजताच त्यांनी त्यांच्याकडील शस्रांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.यात अशोक नगर येथील रहिवाशी 28 वर्षीय जाटव, गुना येथील रहिवासी भार्गव (36) आणि श्योपूर येथील कॉन्स्टेबल मीना (25) यांच्यासह तीन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गिरी यांच्या मनगटावर गोळी लागली.
या घटनास्थळी शिकारींनी दोन पिशव्या मागे सोडल्या ज्यामध्ये पोलिसांना चार हरणांची मुंडके, दोन हरणांचे मृतदेह आणि एक मृत मोर सापडलेला आहे.
याबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले की, शिकाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस तिथे उभे होते आणि हे घडेल याची कल्पना नव्हती. त्यांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असून त्यांना शहीदांचा सन्मान देण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील, तर कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत अनुकंपा नियुक्ती दिली जाईल आणि सर्व मृतांवर पूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. ग्वाल्हेरचे महानिरीक्षक अनिल शर्मा यांची वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे, असेही चौहान यांनी सांगितले.