शासन निर्णय

महाआवास अभियाना अंतर्गत राज्यात साडेचार महिन्यात 7लाख 41 हजार घरकुल बांधकामे- हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री

मुंबई, दि. 1 – राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन 20 नोव्हेंबर 2020 पासून 31 मार्च 2021 या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात 7 लाख 41 हजार 545 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले असून त्यापैकी 3 लाख 621 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत, तर 4 लाख 40 हजार 924 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथवर आहे. प्रगतीपथावर असलेल्या घरकुलांचे बांधकाम चालू महिन्याअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामीण भागात अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी जाहीर केले.
 
दर्जेदार घरकुल बांधकामांसाठी गवंडी प्रशिक्षण, डेमो हाऊसेसची निर्मिती
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, प्रगतीपथावर असलेल्या घरकुलांपैकी 2 लाख 82 हजार 232 घरकुलांचे बांधकाम जोत्यापर्यत (प्लिंथपर्यंत) तर 1 लाख 58 हजार 692 घरकुलांचे बांधकाम लिंटेलपर्यंत झाले असून ही घरकुले या महिन्यात पूर्ण होत आहेत. अभियान कालावधीत 42 हजार 657 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित 63 हजार 343 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. अभियान कालावधीमध्ये 3 लाख 85 हजार 518 लाभार्थ्यांच्या घरकुलांना नव्याने मंजुरी देण्यात आली. वेळेत घरकुले पूर्ण व्हावी व बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये यासाठी गवंडी प्रशिक्षणही राबविण्यात येत आहे, यामध्ये आजअखेर 6 हजार 165 गवंडी प्रशिक्षित करण्यात आले असून 15 हजार 855 गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे.
लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांबाबतची माहिती करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे डेमो हाऊसेसची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 210 डेमो हाउसेसची कामे सुरु असून त्यापैकी 30 डेमो हाउस बांधून पूर्ण झाली आहेत.
 
घरकुलाबरोबर शौचालय, गॅस, नळ आणि वीजजोडणीही
घरकुल बांधणीबरोबरच लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी घरकुल योजनांचा इतर शासकीय योजनांशी कृतीसंगम करण्यात येत आहे. अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेली घरकुले तसेच आधीच्या काळात पूर्ण झालेली परंतु कृतीसंगमाचा लाभ न मिळालेल्या घरकुलांनादेखील अभियान कालावधीत त्याचा लाभ देण्यात आला. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 4 कोटी 6 लाख 37 हजार 201 इतके मनुष्यदिवस निर्मिती करण्यात आली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 6 लाख 37 हजार 974 लाभार्थ्यांना घरकुलासोबत शौचालयाचा लाभ मिळवून देण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत 4 लाख 68 हजार 351 लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा लाभ  देण्यात आला, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 3 लाख 47 हजार 751 लाभार्थ्यांना गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला, सौभाग्य योजनेअंतर्गत 3 लाख 19 हजार 648 लाभार्थ्यांना वीज जोडणीचा लाभ देण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 3 लाख 44 हजार 834 लाभार्थ्यांना उपजिवीकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम केले आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
बहुमजली इमारती, घरकुल मार्टलाही चालना
अभियानामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून यामध्ये पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती निर्माण करण्यात येत आहेत. आजअखेर 921 बहुमजली इमारतींची (जी+2) निर्मिती करण्यात आली  आहे. तसेच जेथे पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त 193 गृहसंकुल उभारण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे साहित्य एकाच छताखाली व जवळच उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये घरकुल मार्ट तयार करण्याचे काम सुरु असून आजअखेर 343 तालुक्यांमध्ये घरकुल मार्ट उभारण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना अधिक सोयीसुविधायुक्त घरकुल बांधकामासाठी बँकेचे 70 हजार रुपये कर्ज स्वरुपात मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आजअखेर 2 हजार 172 लाभार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्यात आले आहे. मुलभूत सुविधांद्वारे (अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पथदिवे, नळजोडणी इत्यादी) 19 हजार 301 आदर्श घरकुलांची उभारणीही अभियान कालावधीत करण्यात आली, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
यापुढील काळातही घरकुल बांधकामांचे महाआवास अभियान मिशन मोडवर राबवून ग्रामीण भागातील सर्व बेघरांना आदर्श पद्धतीची घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.