राजकीय

महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

ठाणे, दि.21 (जिमाका): आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहापूर तालुक्यातील कोठारे येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आणि शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा, वि.जा. व भ.ज. कल्याण समिती प्रमुख आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, प्रकल्पस्तरीय आढावा समिती अध्यक्ष आशा मोरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहब दांगडे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त महेंद्र वारभुवन, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार

यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, आश्रमशाळांच्या केवळ चांगल्या इमारती उभ्या न करता तेथे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून त्यांचे भविष्य घडले पाहिजे. आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची पारदर्शकपणे भरती केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान,तंत्रज्ञान विषयाशी मैत्री करून जागतिक घडामोडीदेखील समजून घेतल्या पाहिजे. शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार असून तो मिळवून देण्याची आमची जबाबदारी असल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.