वृत्तविशेष

महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी आज युक्रेनमधून दिल्लीत दाखल;१२६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

नवी दिल्ली, दि. ३ : गुरुवारी  सात  विशेष  विमानांनी  महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे गेल्या पाच दिवसांत १२६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. देशातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसह या मोहिमेंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत  विशेष  विमानांनी  महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थी  दिल्लीत दाखल झाले आहेत.

थोडक्यात तपशील

एयर इंडियाच्या विशेष विमानाने २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ५८ विद्यार्थी दाखल झाले .२८ फेब्रुवारीला दोन विशेष विमानांनी १४ तर १ मार्च रोजी तीन विमानांनी २६ विद्यार्थी दाखल झाले. २ मार्च रोजी ५ विमानांनी ६४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. तर ३ मार्च रोजी सर्वाधिक ७ विमानांनी ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले.

महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे  निवासी  आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली  २६ फेब्रुवारी २०२२ रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजिकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहेत.

मुंबई येथे सर्वाधिक ७८ विद्यार्थी परतले

या विद्यार्थ्यांना राज्यातील महत्वाच्या विमानतळांद्वारे स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत सर्वाधिक ७८ विद्यार्थी मुंबईला परतले आहेत. पुणे येथे २३, नागपूर येथे १२ तर औरंगाबाद येथे ७ विद्यार्थी परतले आहेत. तीन विद्यार्थी नांदेडमार्गे मुंबई गेले तर दोन विद्यार्थी हैद्राबाद व एक विद्यार्थी गोव्याहून महाराष्ट्रात स्वगृही सुखरूप पोहचला आहे.

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे विमानतळाहून महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे  सुखरुप  स्वगृही  पोहचविण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षामध्ये एकूण २५  अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात सुखरुप पोहोचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.