जिल्हाधिकारी आदेश
महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव ,परभणीत बर्ड फ्लू निष्पन्न

3 दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं आता निष्पन्न झालं आहे. येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच
मागील काही दिवसांपासून राज्यातील ठाणे, लातूर, परभणीसाऱख्या भागामध्ये गिधाड, बगळे, कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत होत्या. राज्यात अद्याप बर्ड फ्लूचा प्रदुर्भाव झाला नसल्याचे राज्य सरकारने सांगितलं होतं. मात्र, आता परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर आले आहे. 3 दिवसांपूर्वी मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने मध्ये प्रदेशमधील भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
मुरुंबा गावातील प्रत्येकाची तपासणी होणार दरम्यान, परभणीमधील मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढळल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे. मुरुंबा गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भागात कुक्कुटपालकांची संख्या मोठी आहे. मुरुंबा, असोला या भागात 10 हजारपेक्षा अधिक कोंबड्या आहेत. या कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर दहा किलोमीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यात अलर्ट
मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. जिल्हा प्रशासन परभणी जिल्ह्यात पक्ष्यांचा सर्वे करणार आहे.आणखी इतर कुठे बर्ड फ्ल्यूचा प्रसार झालेला आहे का? याची माहितीसुद्धा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान, स्थलांतरित पक्ष्यांमुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू आल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय.