राजकीयराष्ट्रीयवृत्तविशेष

महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार; २ कोटींची प्रोत्साहन राशीही प्रदान

खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच राज्याला २ कोटी ७ लाख ३४ हजार आणि ३७५ रुपयांची प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली.

केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाच्यावतीने येथील  डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ६व्या  खाण व खनिज संमेलनात हे पुरस्कार व प्रोत्साहन राशी  वितरीत करण्यात आली. यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी , राज्यमंत्री रावसाहेब दानवे , विभागाचे सचिव आलोक टंडन उपस्थित होते.

राज्याला १ कोटीचा राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार

या समारंभात वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ करिता एकूण तीन श्रेणींमध्ये प्रत्येकी ३ राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. खनिज  श्रेणीत महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. १ कोटी रुपये रोख, चषक आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

२ कोटी ७ लाखांची प्रोत्साहन राशी प्रदान

वर्ष २०२०-२०२१ दरम्यान खनिज ब्लॉकच्या यशस्वी लिलावासाठी देशातील १० राज्यांना या समारंभात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली . महाराष्ट्रालाही या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी २ कोटी ७ लाख ३४ हजार आणि ३७५ रुपयांची  प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली. राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी ही राशी स्वीकारली.

महाराष्ट्राला ५ खनिज ब्लॉक हस्तांतरित

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने प्राथमिक खनिज शोध लावलेल्या महाराष्ट्रातील ५ ब्लॉकचेही यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते राज्याला हस्तांतरण करण्यात आले. भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हयांसाठी हे एकूण ५ ब्लॉक हस्तांतरित करण्यात आले. या हस्तांरणानंतर राज्य शासनाला संबंधित ब्लॉकचा लिलाव करून अधिक खनिज सर्वेक्षण करता येऊ शकेल.

Follow us Mediamail Social👇
Tags
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.