कायदे

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 14 : न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणाची आवश्यकता असून येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे. राष्ट्रीय दृष्टीकोन आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचे योगदान देईल, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे व्यक्त केला.
शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, उर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा.डॉ.विजेंद्रकुमार आदी उपस्थित होते.
भाषणाच्या प्रारंभी विधी विद्यापीठाच्या निर्मितीमागचा ओझरता प्रवास सरन्यायाधीशांनी मांडला. नागपूर शहराला असलेली उत्तम विधिज्ञांची गौरवशाली परंपरा पाहता इथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ असावे, अशी येथील नागरिकांची इच्छा होती. आज त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून न्या.बोबडे म्हणाले, विद्यापीठाची शैक्षणिक इमारत हा आधुनिक वास्तुकलेचा सुंदर आविष्कार आहे. या इमारतीमधील वर्गखोल्यांचे बांधकाम हे जागतिक दर्जाचे आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या क्लासरुम आहेत. उत्कृष्ट दर्जाचे पर्यावरणपूरक असे या इमारतीचे बांधकाम विद्यार्थ्यांच्या आकांक्षाना पल्लवीत करणारे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. न्यायमूर्ती भूषण गवई व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी विधी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख सरन्यायाधीशांनी केला.
न्यायमूर्ती भूषण गवई हे या विधी विद्यापीठाचे कुलपती असतील, असे सरन्यायाधीशांनी यावेळी जाहीर केले. ते म्हणाले, येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या विद्यापीठातून राष्ट्रीय दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. कारण देशभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी येथे अध्ययन-अध्यापन करणार आहेत. इथे प्रादेशिकता, संकुचितता यापेक्षा पुढे जाऊन राष्ट्रीय चारित्र्य असलेले विधिज्ञ घडतील. ऑक्सफर्ड- हॉर्वर्ड-केंम्ब्रीज या विद्यापीठाच्या तोडीचे विद्यापीठ ठरणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या विद्यापीठाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे न्यायशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश. यामुळे  भारतातील या बाबतची समृद्ध ज्ञान परंपरा विद्यापीठाशी जोडली गेली आहे. त्यातून तयार होणाऱ्या भावी पिढ्या निश्चितच धन्यवाद देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
कायद्याची चौकट पाळणाऱ्या महाराष्ट्राला न्यायदानाची मोठी आणि आदर्श परंपरा लाभली असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातही न्यायदानाची परंपरा अत्यंत आदर्शवत होती. रामशास्त्री प्रभुणेसारख्या न्यायदात्यांनी ती पुढे चालवली. लोकशाहीत चार स्तंभाची भूमिका महत्त्वाची असते. त्यातून लोकशाहीला मजबूत आधार मिळत असतो. लोकशाहीचे छत समर्थपणे तोलून धरणारे वकील, विधिज्ज्ञ या विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
कलाकार जीव ओतून जशी मूर्ती घडवतो, तशी भूमिका घेऊन विधी विद्यापीठातील प्राध्यापकांनी जीव ओतून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे. बाबासाहेबांनी सामान्यांसाठी रस्त्यावर उतरुन लढाई केली. त्याप्रमाणे, या संस्थेतून गोरगरिबांशी बांधिलकी जोपासणारे न्यायमूर्ती तयार व्हावेत. न्यायदानाच्या क्षेत्राला आदर आणि आधार देणारी विधी विद्यापीठ मोठी संस्था आहे. या मोठेपणाचा उपयोग छोट्यातील छोट्या माणसाला व्हावा, त्यातून  हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठ व्हावे, असा आशावाद श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला.
विधी क्षेत्रात गुणात्मक बदल व्हावा, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ उभारावे या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले की, मजबूत लोकशाहीचा एक स्तंभ न्यायव्यवस्थेचा असतो. तो उभारण्यासाठी विधी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. विद्यमान सरन्यायाधीशासोबत, निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर व न्यायमूर्ती भूषण गवई यांचे या विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचे योगदान आहे.
विधी विद्यापीठाची निर्मिती ही आपल्या वैयक्तिक सार्थकतेचाही क्षण असल्याचे सांगून न्या.गवई म्हणाले, गुरुकुलाची संकल्पना या विद्यापीठाच्या माध्यमातून  मूर्त रुपात साकारत आहे. लोकशाहीसाठी आवश्यक असणारी मूल्ये या वास्तुच्या रचनेतून प्रतिबिंबीत झाली आहेत. गेल्या पाच वर्षात बहुतांशी काम पूर्ण करण्यात आम्हाला यश आले आहे. सरन्यायाधीशासह तत्कालीन आणि विद्यमान शासनकर्ते यांच्यासह शासनाच्या विविध विभागांनी जाणिवेने सहयोग दिल्याने हे काम उत्तमप्रकारे पूर्ण होत आहे. न्या.गवई यांनी यावेळी विद्यापीठाच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचा तपशीलवार उल्लेख केला. इमारत बांधणी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या निर्मितीमागची  आणि आजवरच्या वाटचालीची संपूर्ण माहिती दिली.
जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले हे विद्यापीठ असून यातून सर्वोत्कृष्ट न्यायाधीश व विधीज्ञ घडावेत, अशी अपेक्षा न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी व्यक्त केली. या संस्थेतून न्यायव्यवस्था समृद्ध करणारा अधिकारी वर्गही तयार व्हावा, असे ते म्हणाले.
विद्यापीठाची ही इमारत आणि परिसरातील इतर कामे अतिशय कठीण अशा कोविड काळात करण्यात यश आल्याचे समाधान व्यक्त करून पालकमंत्री डॉ.राऊत म्हणाले जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या कामाला वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी दिली होती. ती पार पाडण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे स्वप्न जणू प्रत्यक्षात साकारणार आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख ही डॉ.राऊत यांनी केला.
नागपूर, औरंगाबाद व मुंबईत उभारण्यात येत असलेली राष्ट्रीय विधी विद्यापीठे महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा समृद्ध करणारी आहेत, असे सांगून श्री.सामंत म्हणाले या विद्यापीठांसाठी पुरेसा निधी दिला जाईल. मुंबईतील जागेचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल. नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद अशा तीन ठिकाणी विधी विद्यापीठ असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाही मूल्य प्रस्थापित होण्यासाठी कायद्याचे राज्य गरजेचे आहे. तर कायद्याच्या राज्यासाठी मजबूत न्यायव्यवस्था आवश्यक आहे त्यासाठी हे विद्यापीठ मोठे योगदान  देईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधी विद्यापीठाचे काम जलदगतीने झाल्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले.
समतेची शिकवण देणाऱ्या दीक्षाभूमीच्या शहरात विधी विद्यापीठ स्थापन होणे हे आनंददायी असल्याचे मत न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाची वास्तू निसर्गातील पंचमहाभूतांचा आविष्कार घडविणारी असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये कायद्याचे सच्चे पाईक घडविणे हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल. त्यादृष्टीने या विद्यापीठाची उभारणी हे या महामानवाला खरेखुरे अभिवादन आहे, असे गौरवोदगार काढून विधी विद्यापीठाच्या पुढील कामाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी संदेशाद्वारे दिली.
प्रा.आशिष सिंग यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रा. सी. रमेशकुमार यांनी मानले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्हि.एस. सिरपूरकर यांची यावेळी उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. विधी विद्यापीठाच्या इमारतीची वैशिष्ट्य दाखविणारी छोटी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.