मंत्रीमंडळ निर्णय

महिलांनो गरूड भरारी घ्या,तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ८ : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता – भगिनींनी या काळात शौर्य गाजविले. या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तुम्ही गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम शासन करेल, अशा शब्दात प्रोत्साहन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बचतगटातील सुमारे १ लाख महिलांशी संवाद साधला.
ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) ते ५ जून या पर्यावरण दिनापर्यंत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांच्यासह ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर वेबलिंकद्वारे बचतगटांच्या सुमारे १ लाख महिला सहभागी झाल्या होत्या.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प जागतिक महिला दिनी सादर करण्यात आला. यामध्ये महिलांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. त्याचपद्धतीने ग्रामविकास विभागामार्फत सुरु होत असलेल्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानातून पुढील ३ महिने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानातून महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणारी विशेष उत्पादने लक्षात घेऊन बचतगटांनी त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करावे. या उत्पादनांना आपण राज्य, देश आणि जागतिक पातळीवर मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. सध्या सेंद्रीय उत्पादनांना शहरांमध्ये मोठी मागणी आहे. संकरीत गायीपेक्षा देशी गायीच्या दुधाला चांगला भाव आहे. देशी गायीच्या दुधापासून बनविलेल्या तुपालाही अधिक भाव आहे. महिलांनी ही संधी ओळखून सेंद्रीय उत्पादनाचे व्यवसाय सुरु करावेत. राज्यात यापूर्वी ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला मोठे यश मिळाले होते. सर्वांनी मिळून त्याच पद्धतीने ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अभियानाविषयी माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानातून पुढील ३ महिने ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. ‘शेत दोघांचे, घर दोघांचे’ उपक्रमातून मालमत्तेवर महिलेचेही नाव असावे याला चालना देण्यात येईल. महिलांमधील तंबाखुमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती यासाठी मोठी जनजागृती केली जाईल. महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांचे हिमोग्लोबीन व बीएमआय तपासणी करुन त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार रोखणे व महिलांना कायदेविषयक सहाय्य व सल्ला देण्याबाबत उपक्रम राबविण्यात येईल. पुढील ३ महिने अशा विविध उपक्रमांमधून महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील. सर्वांनी अभियानात सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महिलांना खऱ्या अर्थाने सबल करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे लागेल. त्यासाठी महिलांना अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याबरोबर महिला ह्या शारिरीक सुदृढतेबरोबर मानसिकदृष्ट्याही सुदृढ असणे गरजेचे आहे. बालविवाहाचे मोठे आव्हान आजही आपल्यासमोर आहे. राज्य शासनाच्या महिला – बालविकास विभागामार्फत या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानामध्ये महिला-बालविकास विभाग संपूर्ण योगदान देईल. विविध योजना प्रभावीपणे राबवून महिलांचा सर्वांगिण विकास साध्य करु, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाची मार्गदर्शक पुस्तिका, घडीपत्रिका, कॉपशॉपचा लोगो तसेच घरकुल मार्टच्या लोगोचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे आणि मान्यवरांच्या यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.