मुंबईराजकीय

माजी राज्यपाल शंकरनारायणन् यांच्यासह सदस्य रमेश लटके आणि माजी सदस्य हुसेन दलवाई यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केला शोक

मुंबई, दि. 3 महाराष्ट्राचे माजी राज्यपाल काटीकल शंकरनारायणन्, विद्यमान सदस्य रमेश कोंडीराम लटके, तसेच माजी विधानसभा सदस्य तथा माजी मंत्री हुसेन मिश्री खान दलवाई, यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी सभागृहाच्या वतीने शोकप्रस्ताव मांडून संमत केला.

आपल्या शोक प्रस्तावात अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणतात, कै.काटीकल शंकरनारायणन् यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३२ रोजी केरळ मध्ये झाला. केरळमधील पालघाट जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. ते चार वेळा केरळ विधानसभेवर निर्वाचित झाले होते. तेथे त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कै. शंकरनारायणन् यांनी जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्य केले. महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, अरूणाचल प्रदेश, नागालँड व झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेकविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते. अशा या कुशल प्रशासकाचे रविवार, दि. २४ एप्रिल, २०२२ रोजी दु:खद निधन झाले आहे.

हे पण वाचा : शिवसेनेचे 7 खासदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात, चार खासदारांनी आज भेट घेतल्याची सूत्रांची माहिती

advertisement by sponsered

कै. रमेश कोंडीराम लटके (विद्यमान विधानसभा सदस्य)

कै. रमेश कोंडीराम लटके यांचा जन्म २१ एप्रिल, १९७० रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण एसएससी पर्यंत झाले होते. कै. लटके यांनी सिद्धीविनायक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच पूर्व मोगरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. मुंबईतील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन १९९७, २००२ व २००७ असे तीन वेळा ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. तर २०१४ व २०१९ मध्ये अंधेरी (पूर्व) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. विधानमंडळाच्या आश्वासन समिती, ग्रंथालय समिती, मराठी भाषा समिती अशा अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या उमद्या समाजसेवकाचे बुधवार, दिनांक ११ मे, २०२२ रोजी दुःखद निधन झाले.

हुसेन मिश्रीखान दलवाई, (माजी वि.स.स. व माजी मंत्री)

कै. हुसेन मिश्रीखान दलवाई यांचा जन्म १७ ऑगस्ट १९२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए., एलएलबी. पर्यंत झाले होते. नवकोंकण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भारत सेवक समाजाचे संचालक म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले होते. सन १९४०-१९४६ या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय सेवादलात कार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे वीस शाळांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

कै. दलवाई सन १९६२, १९६७ व १९७२ असे तीन वेळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी एप्रिल १९७७ ते जुलै १९७८ या कालावधीत विधी व न्याय, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. ते १९८४ मध्ये राज्यसभा तसेच १९८५ मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. अशा या जेष्ठ समाजसेवकाचे सोमवार, दिनांक १६ मे, २०२२ रोजी दु:खद निधन झाले.

अध्यक्षांनी सदर शोक प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर सर्व सदस्यांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि प्रस्ताव संमत केला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.