शासन निर्णय

“माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट CEO म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

जळगाव, दिनांक 5 (जिमाका वृत्तसेवा) – पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान 2020-21 अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बन्सोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

https://youtu.be/SbdVBrs0jxI
            त्याचबरोबर या अभियानातंर्गत नाशिक विभागाने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्तांचा पुरस्कार नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
            राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गत सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची 2 ऑक्टोबर, 2020 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ आज पर्यावरण दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पार पडला.  या समारंभासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, बी. ए. बोटे आदि उपस्थितीत होते.
            या स्पर्धेत नगरपरिषद गटात राज्यातील 222 नगरपरिषदा सहभागी झाली होत्या. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषदेला तृतीय क्रमांकांचा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन आणि मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाईन स्वीकारला.


            सर्वोत्कृष्ट नगरपंचायत गटात राज्यातील 130 नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा श्रीमती नजमा तडवी आणि मुख्याधिकारी समीर शेख यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वीकारला.
            सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात राज्यातील 291 ग्रामपंचायतीची निवड झाली होती. या गटात जिल्ह्यातील चिनावल, (ता. रावेर) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार सरपंच सौ. भावना योगेश बोरोले आणि ग्रामसेवक संतोष सपकाळ यांनी स्वीकारला तर पहुरपेठ, (ता. जामनेर) ग्रामपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार सरपंच सौ. निता रामेश्वर पाटील आणि ग्रामसेवक दत्तात्रय टेमकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वीकारला.  
            सर्वोत्कृष्ट महानगरपालिका (अमृत शहरे) या गटात राज्यातील 43 शहरे सहभागी झाले होते. या गटात ठाणे महानगरपालिकेस प्रथम क्रमांक, नवी मुंबई महानगरपालिकेस द्वितीय क्रमांक, बृन्हमुंबई महानगरपालिकेस तृतीय क्रमांक तर पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका व बार्शी, जि. सोलापूर नगरपरिषदेस उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.