मातेने सहा मुलांना विहिरीत फेकले, स्वतःही मारली उडी, खळबळजनक घटना

महाड दि:31आई आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी एक प्रचंड खळबळजनक घटना समोर आली असून महाडमध्ये एका महिलेने पोटच्या सहा मुलांची विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या महिलेच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचे या महिलेने दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे. पती सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचे म्हटले असले, तरी यामध्ये इतर काही पैलू आहेत का ? या दृष्टिकोनातून तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या तपास पथकांमार्फत या गंभीर घटनेचा तपास सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान, या घटनेतील लहानग्या मुलांच्या मृतदेहांवर असनपोई गाव हद्दीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृतांमध्ये दीड ते दहा वर्षांच्या एक मुलगा आणि पाच मुलींचा समावेश आहे. रुना सहानी असे आरोपी मातेचे नाव आहे.
दरम्यान, मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले सहानी कुटुंब कामधंद्याच्या निमित्ताने महाडमधील ढालकाठी येथे आले. आरोपी रुना सहानी आणि तिचा पती चिखुरी सहानी यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत. चिखुरीला दारुचे प्रचंड व्यसन असून तो दररोज घरी दारुच्या नशेत यायचा आणि पत्नीला मारहाण करून त्रास द्यायचा. याच त्रासाला कंटाळून महिलेने आधी आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेतली. मात्र महिलेला उडी मारत असताना जवळील आदिवासी पाड्यातील काही लोकांच्या दृष्टीस पडले.काही पुरूषांनी महिलेला विहिरीतून बाहेर काढून वाचवले आणि पाड्यावर आणून त्यानंतर त्यांनी महिलेकडे सदर प्रकाराबाबत विचारपूस केली असता महिलेने सर्व घटना सांगितली. त्यानंतर सहा मुलांना विहिरीत फेकल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक पोलिस, बचाव पथक आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि सहाही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आलेले आहे.