मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

CM Eknath shinde | एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे राज्यातील पोलिस महासंचालक यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित व महत्वाचे पद असलेले मुंबईचे पोलिस आयुक्तपद हे संजय पाडे सेवानिवृत झाल्याने रिक्त झाले होते. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP) यांनी सुद्धा कालच पदभार घेतलेला असून त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयाचं खातं जाणार असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.
2014 मध्ये गृहमंत्रीपद फडणवीस यांचेकडेच होते
मागील 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदासह गृह खातंही होतं. यामुळे आताच्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही फडणवीसांकडेच गृह खातं असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावेळी शिवसेनेला फक्त १२ खाती दिली गेली होती. पण आता एकनाथ शिंदेंकडे दावेदारीसाठी मोठी ताकद आहे. यामुळे नगरविकास खात्यासह इतर महत्त्वाची खाती शिंदे गटाकडे असतील, अशी चर्चा आहे.
भाजपमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, संजय कुटे, महेश लांडगे यांच्यासह काही आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.तर एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, बच्चू कडू, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.