मुंबई

मुंबईतील विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 2 : मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

वरळी-शिवडी जोडरस्ता, नरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, कलानगर जंक्शन आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले.

बैठकीस आमदार सर्वश्री सदा सरवणकर, रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील शिंदे, स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ, समाधान सरवणकर, श्रीमती श्रद्धा जाधव, रोहिणी कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामामुळे बाधित रहिवाश्यांचे योग्य स्थलांतर करण्यात यावे, पायाभूत आणि नागरी सोयी सुविधांना बाधा पोहोचल्यास त्या तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात, काम सुरू होण्यास विलंब असेल त्याठिकाणी बॅरिकेट्स लावू नयेत. नरिमन पॉईंट-कफ परेड प्रस्तावित जोड रस्त्यामुळे बधवार पार्क कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या बोटींच्या वाहतुकीस बाधा येणार नाही यासाठी त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्याच्या सूचनाही श्री. ठाकरे यांनी केल्या.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, नागरी सोयीसुविधा, जेथे शक्य आहे तेथे नागरी वने विकसित करणे, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड तसेच उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेत सुशोभीकरण आणि नागरी सुविधा, कलानगर जंक्शन आणि स्थानिक रहिवासी संस्थांच्या परिसरात नागरी सुविधा तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक बेट तयार करून ते सुशोभित करणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावयाची सौंदर्यीकरणाची कामे आदींसंदर्भातही श्री.ठाकरे यांनी आढावा घेऊन योग्य नियोजनाबाबत निर्देश दिले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.