मुंबई

मुंबईला संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च “वृक्षनगरी” बहुमान प्रदान

मुंबई : मुंबईत उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमित करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची शास्त्रशुद्ध पद्धतीने राखण्यात येणारी निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप यांची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारितील ‘अरबर डे फाऊंडेशन’ने मुंबईला “वृक्ष नगरी”चा बहुमान बहाल केला आहे. हा बहुमान मिळविणारी मुंबई हे भारतातील दुसरे शहर ठरलेलं आहे.
मुंबईमधील वृक्षवल्लीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध भागात मियावाकी जंगले उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर नियमितपणे वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने झाडांची राखण्यात येणारी निगा, वृक्षसंपदेबाबत करण्यात येणारी जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप आदींची दखल घेत ‘अरबर डे फाऊंडेशन’ने मुंबईची वृक्ष नगरी या बहुमानासाठी निवड केली.
जगातील विविध देशांमधील अनेक शहरांमधील वृक्षसंपदेशी संबंधित विविध निकषांची या संदर्भात तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा बहुमानासाठी मुंबईची निवड करण्यात आली. यापूर्वी भारतातील हैदराबाद शहराला हा बहुमान मिळालेला आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिलेली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अखत्यारीतील ‘अरबर डे फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी मुंबईला मिळालेल्या बहुमानाची माहिती विशेष पत्राद्वारे पालिकेला कळविली. या पत्रात त्यांनी मुंबईचे अभिनंदन केलेलं आहे.
पालिका मुख्यालयात बुधवारी पार पडलेल्या एका विशेष बैठकीत उपस्थित असलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘अरबर डे फाऊंडेशन’च्या पत्राची प्रत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि परदेशी यांना दिली. तसेच उभयतांनी केलेल्या कामगिरीचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू, संजीव कुमार, सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित कुंभार, सहआयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, उपायुक्त संजोग कबरे, अजय राठोर आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.