राजकीय

खडसेंना उमेदवारी जाहीर मात्र ‘खेला’ बाकी ? AB फॉर्मच खर ‘रहस्य’ उलगडणार, ऐनवेळी टिकिट कापण्याचा भाजपचा इतिहास

रावेरमध्ये कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार ?

मुंबई ,दि-१४ मार्च, संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीचा संचारलेला आहे भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत रावेर लोकसभा क्षेत्राच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करून सर्वच राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरविलेले आहेत. अगदी स्वतः विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना सुद्धा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याबाबतची साशंकता होती, असे त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवलेले आहे. तसेच भाजपच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सुद्धा रक्षा खडसेंना उमेदवारी दिली असल्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. काहींची तर झोपच उडालेली आहे.भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जे धक्का तंत्र वापरलेले आहे,ते निश्चितच एक रहस्य असणार आहे. त्यामध्ये निश्चितच काहीतरी विचारपूर्वकच निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप नेतृत्वाने एका दगडात चार पक्षी मारण्यासाठी दगड हवेत भिरकावला आहे.फक्त तो किती पक्षांना मारतो हेच पाहण्यासाठी जनता व प्रसारमाध्यमं आसुसलेली आहे.
दरम्यान, रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याआधी काही जण उमेदवारीसाठी इच्छुक होते. यापैकी माजी खासदार कै.हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांचे नाव सर्वात आघाडीवर होते,असे बोलले जाते.रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर होताच जावळे यांच्या समर्थकांना धक्का बसून त्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यातच यावल व चोपडा तालुक्यात काही स्थानिक कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण ज्या पद्धतीने अमोल जावळे यांचे ‘प्रेझेंटेशन’ सुरू होते त्याला मोठा धक्का बसलेला होता.
मात्र सर्वात मोठा धक्का हा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांना बसलेला आहे. मात्र गिरीश महाजन यांच्या जामनेर किंवा इतर ठिकाणाहून कोणीही कार्यकर्त्यांनी आतापर्यंत याबाबत ‘ब्र’ काढलेला नाही. स्वतः गिरीश महाजन यांनी कोणतीही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना अजूनपर्यंत दिलेली नाही. अगदी सन्नाटा पसरावा तशी परिस्थिती ‘खडसे’ कुटुंबाचे विरोधक असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांची झालेली आहे.
मात्र खरा ‘खेला’ आता पुढे होणार आहे.गेल्या दोन महिन्यात अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथराव खडसे यांनी समोरचा उमेदवार कोणीही असो मी लोकसभा लढवणारच अशी गर्जना केली होती. मात्र गेल्या आठवड्याभरापासून ते तब्येत खराब असल्याच्या कारणास्तव डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निवडणूक लढणार असल्याचे सांगत आहे. रक्षा खडसेंना जाहीर झालेल्या भाजपच्या तिकिटामुळे खडसे कुटुंबात गोंधळ उडालेला दिसून येत आहे.कारण या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी आणि त्यांना पूर्ण सहकार्य करू असे जाहीर केलेले आहे. त्यामुळे रोहिणी खडसे काय निर्णय घेतात हे आता लवकरच कळेल.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव स्वतः एकनाथराव खडसे यांनी लोकसभा निवडणूक न लढवल्यास त्यांची कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे उमेदवारी मिळवून लढणार का ? की माघार घेऊन रक्षा खडसेंचा पुन्हा लोकसभेत पाठवण्याचा मार्ग मोकळा करणार ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
खरा मुळ मुद्दा हा आहे की रावेर लोकसभा इंदिरा काँग्रेस लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढणार हा सुद्धा आता एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. काल रात्री एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे आणि शरद पवार यांच्यात मुंबईतील कार्यालयात बंदद्वार चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे,मात्र या चर्चा तपशील बाहेर आलेला नाही.
रक्षा खडसेंनाच AB फॉर्म मिळणार ?
2014 साली भाजपने सर्वप्रथम हरिभाऊ जावळे यांना भाजपची उमेदवारी जाहीर केलेली होती.मात्र ऐनवेळी जावळे यांचे तिकीट कापून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर करून भाजपचा अधिकृत AB फॉर्म दिला होता.
पुन्हा 2019 च्या निवडणुकीतच्या दरम्यान जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी स्मिता वाघ यांना भाजपने सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली होती.मात्र ऐनवेळी त्यांचाही पत्ता कट करून उन्मेष पाटील यांना AB फॉर्मसह उमेदवारी जाहीर केली होती. जळगाव जिल्ह्यातील भाजपचा हा ऐनवेळी पत्ता कट करण्याचा इतिहास बघता तोच कित्ता आता रावेर लोकसभा उमेदवारीसाठी गिरवला जाणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. म्हणजेच अजूनही रावेर लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवारी संदर्भात AB फॉर्मसह अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत उमेदवारी बाबत साशंकता आहे.
अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जळगाव दौऱ्यावर येऊन गेले होते.त्याच दिवशी जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरी संदर्भात नाराजीचा सूर असल्याचा ‘रिपोर्ट‘ अमित शाह यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती. त्याचवेळी लोकसभेचे दोन्ही उमेदवार बदलण्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. त्याचवेळी एकनाथराव खडसे हे सुद्धा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा समोर आलेल्या आहेत.त्याच वेळी रिपोर्टच्या अनुषंगाने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता आधीच कट झालेला आहे.
दुसरीकडे भाजपने अबकी बार 400 पार चा नारा दिलेला असून एक एक जागा जिंकण्यासाठी खास डावपेच आखले जात आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास रक्षा खडसेंच्या विरोधात खडसे कुटुंबातील कोणीही उमेदवार असो वा नसो खडसे कुटुंबालाच निवडणूकीतून ऐनवेळी बाद करण्याच्या विशेष रणनीतीच्या प्लॅन B चा हा खास ‘मास्टर प्लॅन’ आहे का ? की रक्षा खडसेंना जिंकून  आणण्यासाठीच उमेदवारी जाहीर केली आहे ? हे येणारा काळच ठरवेल.असो मात्र  खडसे हा चक्रव्यूह कसे भेदतात ? यावरच त्यांचे लोकसभा निवडणुकीतील भवितव्य अवलंबून आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button