मनोरंजनमुंबईराष्ट्रीय

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मिफ्फ-2022 ची आज शानदार कार्यक्रमाने सांगता

मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या मिफ्फ-2022 या, माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या चित्रपटाचा सुवर्णशंख, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला.

या चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटांमधून परीक्षकांनी विजेत्या चित्रपटांची निवड केली. पोलंडच्या कातारझायन अगोपोवीस्ज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ या अॅनिमेशनपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटासाठीचा पुरस्कार देण्यात आला. रौप्यशंख, प्रशस्तीपत्र  आणि 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार,(45 मिनिटांपर्यंत)  रौप्य शंख, भारतातील ‘साक्षात्कारम’ या मल्याळी आणि आणि फारो बेटांवरील ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटांना विभागून मिळाला आहे. सुदेश बालन यांनी ‘साक्षात्कारम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुंबई आयआयटीने त्याची निर्मिती केली आहे.

या महोत्सवामध्ये उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय श्रेणीत विजेते ठरलेल्या सर्व चित्रपटांचे आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. मी स्वतः चित्रपटांचा फारसा चाहता नसलो तरीही मला चित्रपट विश्वाविषयी अत्यंत आदर आहे. कॅमेराच्या माध्यमातून नेहमीचे जग आणि  व्यक्ती यांना वेगळेच स्वरूप दिले जाते. या महोत्सवात 800 हून अधिक चित्रपट दाखविण्यात आले.

अत्यंत साध्या घटना आणि व्यक्तींच्या माध्यमातून आपले चित्रपट निर्माते अत्यंत अभिनव जग उभे करतात. खरेतर अनेकदा हे अॅनिमेशनपट, माहितीपट तसेच लघुपट कमी वेळात फार मोठा संदेश देणारे असतात. हे सर्व चित्रपट समाजाचा आरसाच असतात आणि केवळ मनोरंजनापेक्षा या प्रकारच्या चित्रपटांनी समाजाच्या हिताचे, सुधारणेचे कार्य करावे, समाजाला प्रेरणा देण्याचे तसेच अज्ञान दूर करण्याचे कार्य करावे. येत्या काळात आपले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडे असलेली कल्पनाशक्ती, दूरदृष्टी तसेच प्रतिभा यांचा योग्य वापर केला जावा आणि समाजासाठी काही भरीव कार्य केले जावे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यावेळी म्हणाले की, “मोठे, पूर्ण लांबीचे चित्रपट बनवतांना, प्रेक्षकांचा विचार केला जातो. मात्र, जेव्हा माहितीपट, लघुपट तयार केले जातात, तेव्हा तुम्ही प्रेक्षकांचा विचार करुन सिनेमे बनवत नाही. तुम्हाला वाटते, तुम्हाला काहीतरी सांगायचे असते,  म्हणून तुम्ही हे माहितीपट बनवता. म्हणून ते स्वतःच्या आनंदासाठी असतात म्हणूनच अधिक, सृजनात्मक आणि अस्सल असतात. हेच माहितीपटांचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरतात”. इथे येणारे युवक उत्साहाने असे माहितीपट बनवत असतात, हे कौतुकास्पद आहे, या माहितीपट-लघुपटांचे महत्व पैशांत मोजता येणार नाही असे बेनेगल यांनी सांगितले. मिफ्फमुळे अशा माहितीपटांना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे, तसेच आज माहितीपट, लघुपट निर्मात्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म सारखी नवी माध्यमे देखील उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्यांच्या प्रतिनिधी म्हणून मीना राड यांनी आपला अनुभव विशद केला. फिल्म्स डिव्हिजन हे चित्रपटांसाठी एक सशक्त मंच आणि बाजारपेठ ठरले आहे.  या सात दिवसांत सिनेमाप्रेमींना उत्सुकतेने सिनेमा बघतांना, त्याविषयी चर्चा करतांना, अनुभवी सिनेनिर्मात्यांशी चर्चा करतांना पहिले, हा उत्साह आणि शिकण्याची जिद्द कौतुकास्पद होती .सर्वच सिनेमांची गुणवत्ता अत्यंत उत्तम होती, असे त्या म्हणाल्या. मिफ्फच्या संपूर्ण चमूने उत्तम आयोजन केले होते. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे अभिनंदन, ज्यांना नाही मिळाले, त्यांनाही शुभेच्छा, तुमचेही काम उत्तम होते, असे त्यांनी सांगितले. हा महोत्सव दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्पर्धा गटांसाठीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष, संजित नार्वेकर यांनी यावेळी ज्यूरी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडले. परीक्षक म्हणून आम्हाला, इथे देशातले सर्वोत्तम माहितीपट, लघुपट, माहितीपट बघण्याची संधी मिळाली. एकूण 67 सिनेमे पहिले. विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे, पहिल्यांदा लघुपट तयार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. माहितीपटांची संख्या कमी होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सिनेमांची संख्या केवळ पांच होती, हे निराशाजनक होते, असे सांगत ती वाढवायला हवी असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या चित्रपटासाठी वेगळा विभाग पूर्वी होता, तो पुन्हा सुरु करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर यांनी  या महोत्सवाची माहिती देणारा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.

कोरोना महामारीनंतरचा हा पहिला महोत्सव संपन्न झाला आणि तो खरोखरच यशस्वीपणे पार पडला, अशा शब्दांत भाकर यांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवाचे यश म्हणजे, भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला दिलेली मानवंदना असल्याचे ते म्हणाले. माहितीपटांच्या बाजारपेठेसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या हायब्रिड महोत्सवात जवळपास 380 चित्रपट दाखवण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात मिफ्फ-2022ची ठळक वैशिष्ट्ये सांगणारी एक लहान चित्रफीत देखील सादर करण्यात आली.

गान कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी नॉर्दन लाईट्स या कलापथकातर्फे रंगमंचावर नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.