शासन निर्णय

मेळघाटात ‘मनरेगा’द्वारे रस्त्यांची कामे प्राधान्याने राबवा-अपर मुख्य सचिव नंदकुमार

अमरावती, दि. 4 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) मेळघाटात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्यासाठी रस्त्यांची कामे प्राधान्याने राबवावीत, असे निर्देश अपर मुख्य सचिव (रोहयो) नंदकुमार यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील मनरेगा कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बचत भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेच्या प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती देशमुख, मनरेगा उपायुक्त नरेंद्र चापले आदी यावेळी उपस्थित होते.

मेळघाटात मनरेगातून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश अपर मुख्य सचिवांनी दिले. ते म्हणाले की, अधिकाधिक रोजगारनिर्मितीबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. मेळघाटात मनरेगातून सुमारे 35 कोटी रूपये निधीतून रस्त्यांची कामे राबविण्याचे नियोजन आहे. उद्दिष्टानुसार कामे पूर्ण करावीत. मेळघाटात स्थलांतर रोखण्यासाठी सातत्यपूर्ण कामे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. कुशल कामांच्या खर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा यावेळी झाली.

मनरेगा कामांमध्ये जिल्ह्यात आजमितीला 76 हजार 665 मजूर उपस्थिती आहे. ठिकठिकाणी ग्रामपंचायती, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प., पाटबंधारे आदींच्या माध्यमातून सुमारे 10 हजार 316 कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, आवश्यक तिथे कामांची गरज लक्षात घेऊन नियोजनानुसार कामांना चालना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.