राष्ट्रीय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन

बुलडाणा, (जिमाका) दि. 4 :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव राजवाडामधील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळाला भेट दिली. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या सहायक संचालक जया वहाने, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसिलदार सुनील सावंत आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.

राजवाड्याच्या दरवाजापासून ते आतील सर्व भागाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. दरवाजावर असलेले वैशिष्ट्य पूर्ण नारळाचे दगडी तोरण, दरवाजाच्या आतील नगारखाना, तसेच आतील विविध भाग त्यांनी पाहिले व माहिती जाणून घेतली. राजमाता जन्मस्थळी जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

मंदाकिनी खंडारे या महिला गाईडने त्यांना राजवाडाविषयी सर्व माहिती दिली. त्याबद्दल राज्यपालांनी तिचे कौतुक केले व अभिप्राय पुस्तकात नोंदही केली. या ठिकाणी वंशज श्री. जाधव कुटूंबियांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी माध्यमांशी बोलताना म्हणाले,  राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन मी स्वतःला धन्य समजतो. मी या भूमीला नमन करतो.

या ठिकाणचा सर्वांगीण विकास व्हावा, असे पालकमंत्री डॉ शिंगणे यांना सांगितले.  या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येऊन येथील अर्थचक्राला गती येईल, अशा पद्धतीने विकासाचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

*************

ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सिंदखेड राजा येथील  ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या जया वहाणे, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वंशज शिवाजीराजे जाधव यांनी तलावाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. या तलावातून होणाऱ्या सिंचन व्यवस्थेची रचना तसेच तलावातील अतिरिक्त पाण्याचे सांडव्यातून होणारे निचरा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

या तलावाच्या पर्जन्य क्षेत्रात वृक्ष लागवड करावी. तसेच तलाव परिसरात वृक्ष लागवड व संवर्धन करावे, असे निर्देश राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

०००००

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची जिजाऊ सृष्टीला भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंदखेड राजा दौऱ्यादरम्यान सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीला भेट दिली. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतिष तायडे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, वंशज शिवाजीराजे जाधव, पुरूषोत्तम खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याठिकाणी राज्यपाल यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच या ठिकाणची माहिती जाणून घेतली. परीसरात वृक्षारोपण करून सुशोभीकरण करण्याचे त्यांनी सांगितले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.