राजकीयसोलापूर

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी; शौचालयाच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी शासन सर्व प्रकारची मदत करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर/पंढरपूर दि, 10 :- संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्त्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात या मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता व ग्रामसभा दिंडी समारोप कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाला.

यावेळी आमदार तानाजी सावंत, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पाणी पुरवठा विभागाचे सह सचिव अभय महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चे प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  राज्यातील अनेक गावे स्वच्छ आणि समृद्ध होत आहेत. राज्यात वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहीम सुरू आहे.  पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक शौचालये उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच यापूर्वी बांधलेली शौचालये दुरुस्ती अभावी वापराविना पडून राहू नये यासाठी दुरुस्ती व डागडुजीला शासन मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

निर्मलवारी स्तुत्य उपक्रम

स्वच्छता दिंडीचा गेल्या 17 वर्षापासून पुणे ते पंढरपूर एक चांगला उपक्रम सुरु आहे.

या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये सामाजिक प्रबोधन केले जात आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात ग्राम स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी व त्यातून ग्रामीण भागाचे जीवनमान स्तर उंचावण्यास मदत मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाच्या संकल्पनांची ग्रामीण भागात अंमलबजावणी करून शाश्वत विकास करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी म्हटले. ‘स्वच्छता वारी निर्मल वारी’ हा उपक्रम अत्यंत चांगला असून यातून ग्रामीण भागाच्या विकासात मदत होणार असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी देऊन या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे कामही प्रभावी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी- कर्मचारी यांचे व यासाठी प्रबोधन करणाऱ्या कलाकारांचे त्यांनी कौतुक करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता दिंडीत उत्कृष्ट काम करणाऱ्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सोलापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, साताराचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, पुणे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांचा समावेश आहे.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा समारोप कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते “यशोगाथा जिल्हा परिषदेची” या पुस्तकाचे व आषाढी वारी 2022 या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लोककलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन स्वच्छतेचा संदेश दिला. पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आभार मानले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.