रेल्वे प्रवासात चोरी: प्रवाशाला 9% व्याजाने नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश

जळगाव दि-11 रेल्वे प्रवासात आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सामान तथा ऐवज चोरीस गेल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही रेल्वे विभागाची असल्याचा निकाल जळगाव ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेला आहे. याबाबत एम परवीन नवाब अहमद व त्यांचे पती ॲड शेख नवाब अहमद दोन्हीं रा.भुसावळ जि.जळगाव यांनी दि-18/03/2019 रोजी eतिकीट खरेदी केले. त्यानुसार त्यांनी दि – 12/04/2019 रोजीचे ट्रेन नंबर 01664 हबीबगंज धारवाड एक्सप्रेस चे रुपये 750 मात्र अदा करून काढले. तसेच रुपये 0.98 अदा करून सदर तिकिटावर यात्री विमा काढला. त्यानंतर दि- 12/04/2019 रोजी तक्रार हे भुसावळ ते पुणे S5 या बोगीमध्ये बर्थ क्रमांक सात व आठ यावर प्रवास करत असताना मध्यरात्री भुसावळ स्थानकातून गाडी सुटल्यानंतर रात्री 3 ते 3.30 चे दरम्यान सदर गाडी मनमाड स्टेशनवर पोहोचून पुण्याकडे जाण्यास सुटली असता तक्रार झोपलेले असतांना त्यांचे डोक्याखाली असलेली क्रीम कलरची लेडीज पर्स अनोळखी इसमाने हिसकावून चोरून नेली. त्यावेळी तक्रारदार व तिचे पतीने आरडाओरडा केला तसेच आरपीएफ व जीआरपी पोलीस यांना हाक मारली मात्र त्यावेळी कोणीही हजर नसल्याने मदतीसाठी कोणी आले नाही. सदर पर्समध्ये रोख 25000 रुपये तसेच दहा ग्रॅम सोन्याची चैन ,दोन ग्रॅम सोन्याचे पेंडल ,दोन टायटन घड्याळ, तक्रारदाराचे आधार कार्ड, विवो कंपनीचा मोबाईल व इतर कागदपत्रे घेऊन अज्ञात चोर फरार झालेला होता. सदर तक्रारदार यांना झालेल्या मानसिक शारीरिक व आर्थिक नुकसानीपोटी रेल्वे विभागाकडून भरपाई मिळावी अशी तक्रार एम परवीन नवाब अहमद यांनी केली होती.
तिकिट खरेदी केले म्हणून “ग्राहक“
याबाबत ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सुनावणी वेळी रेल्वे प्रशासनाने मात्र त्यांची बाजू मांडत सदरील सामान रेल्वे प्रशासनाकडे प्रवासादरम्यान बुक केलेले असेल व त्या बाबतची पावती तक्रारदार यांनी दिलेली असेल तरच रेल्वे प्रशासन भरपाई देण्यास बांधील आहे असा दावा सुनावणीच्या वेळी ग्राहक आयोगाकडे केलेला होता मात्र ग्राहक आयोगाने हा दावा फेटाळून लावत विशिष्ट रक्कम अदा करून तिकिट खरेदी केल्यानंतर तक्रारदाराने रेल्वेची सेवा घेतल्याने तक्रारदार हा रेल्वेचा “ग्राहक” या संज्ञेत येत आहे. तसेच रात्रीच्या सुमारास प्रवास करताना ग्राहकांना योग्य ती सुरक्षेची जबाबदारी प्रदान न करून सेवेत सर्वस्वी त्रुटी राहिल्याच्या निष्कर्ष यातून निघालेला आहे. तक्रारदार यांची झालेली नुकसान भरपाई संबधीत रेल्वे प्रशासनाने द्यावी असा निकाल दि-27/01/2022 रोजी देण्यात आलेला आहे.
नुकसान भरपाई 9%ने द्यावी
याबाबत तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रक्कम रू 73779 मात्र दि-12/04/2019 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 % व्याजासह अदा करावी. तसेच तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000 मात्र व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रुपये 5000 मात्र अदा करावेत असा निर्णय ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव अध्यक्ष श्रीमती पुनम मलिक यांनी दिलेला आहे.
तक्रारदार यांच्या तर्फे ऍड राजेश उपाध्याय व ऍड हेमंत भंगाळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.