रोझोद्यात वृद्ध पती-पत्नींचा खून करण्यात आल्याने खळबळ

सावदा येथून जवळच असलेल्या रोझोदा या छोट्याशा गावात येथील एका वृध्द दाम्पत्याची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने रोझोदा सह परिसरात खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,रोझोदा येथील निवृत्त ग्रामसेवक ओंकार पांडुरंग भारंबे ( वय 90 ) आणि त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे ( वय 85) हे वयोवृध्द दाम्पत्य राहते.ते रहिवास करीत असलेल्या परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून काही दिवसांपासून जाहीर करण्यात आलेला आहे .शासकीय नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर व आशा सेविका घरी येऊन झोन परिसरातील नागरिकांची तपासणी करत असतात .या अनुषंगाने आज सकाळी डॉक्टरांचे पथक तपासणी करिता आले असता त्यांना भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा थोडा उघडा दिसला . आवाज देऊनही घरातून कुणी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडला .तेव्हा हे दोन्ही पती – पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले दिलेल्या माहितीनुसार सावदा येथील पोलिसांनी तेथे तातडीने धाव घेतली .एपीआय राहूल वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले असून त्यांनी माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. तर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी देखील रोझोदा येथे घटनास्थळी भेट दिली आहे .शेवटचे वृत्त हाती आले तोवर दोन्ही जणांचे मृतदेह घटनास्थळीच पडलेले होते .तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती .फॉरेंसिक लॅबचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करिता आलेले आहे.भारंबे दापत्यास २ मूल,2 मुली असून मुले नोकरीनिमित्त बाहेर गावी असतात अशी माहिती गावातील नागरिक यांनी दिलेली आहे.