शासन निर्णय

लाॕकडाऊन असा हवा की विषाणूने नाॕकडाऊन व्हायची वेळ येऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 6 : कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरु करावेत, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक, सीआयआयचे माजी अध्यक्ष उदय कोटक, फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर, सीआयआयचे नियुक्त अध्यक्ष आणि बजाज फिनसर्वचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष बी. थियागराजन, पिरामल उद्योग समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, लार्सन आणि टुब्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन सुब्रमन्यन, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिष शाह, आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका, टाटा सन्स लिमिटेड चे इन्फास्ट्रक्चर, डिफेंस आणि एरोस्पेस चे अध्यक्ष बनमाली अग्रवाल, हिरानंदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उद्योजक रमेश शाह, नौशाद फोर्ब्स, बोमन इराणी, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी आदी उद्योजक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत ज्या पद्धतीने कोरोना साथीची परिस्थिती हाताळली गेली त्याची जगात प्रशंसा होत आहे. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. दिड वर्षात कोरोना परिस्थितीला हाताळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्याच दरम्यान कोरोना विषाणूचे स्वरूप बदलल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन आणि नॉकडाऊन
अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे, किंवा कडक याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेतील. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, नाहीतर कोरोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले. आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, आणि कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या शिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मिशन ऑक्सीजन
गेल्या दिड वर्षापूर्वी राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यात आले. कोरोना सुरु झाला तेव्हा केवळ दहा हजार बेडची सुविधा होती आता साडे चार लाखांपर्यंत बेड सुविधा आपल्याकडे आपण निर्माण केली आहे. सत्तर ते पच्चाहत्तर टक्के लोकांमध्ये लक्षणे आढळत नाहीत. दहा टक्के लोकांना अतीतिव्र स्वरुपाचा त्रास होतो आहे. यात ऑक्सीजनची आवश्यकता वाढ़ली आहे. राज्यात 1200 मेट्रीक टन एवढे ऑक्सीजनची निर्मिती होते. यातील काही उद्योगक्षेत्रासाठी वापरले जाते. यावेळी उद्योग क्षेत्राने सहकार्य केल्याने हे सर्व ऑक्सीजन रुग्णांसाठी वापरता आले. याशिवाय बाहेरील राज्यातून 500 मेट्रिक टन एवढ़े ऑक्सीजन आणण्यासाठीही उद्योजकांनी मदत केली असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सध्या राज्यात 3000 मेट्रिक टन ऑक्सीजनची गरज लागू शकेल असा अंदाज आहे. ही पूर्तता मिशन ऑक्सीजन अंतर्गत पूर्ण करण्यात येत आहे. लसीकरणाबाबत माहिती देतांना ते म्हणाले, दिवसाला 5 लाख लसीकरण आपण केले आहे. 10 लाख लस देण्याची तयारी आहे पण लस उपलब्ध नसल्याने आपल्याला मर्यादा पडल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वीची काळजी
पावसाळ्याशी संबधित आजारांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांना रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठून देण्याचे आवाहन केले. बाहेर राज्यातून येणाऱ्‍या कामगारांची नोंद ठेवण्यात यावी, तसेच बाहेर राज्यातून आल्या नंतर सात दिवस अलगिकरणात ठेऊन त्यांची योग्य तपासणी झाल्यानंतरच त्यांना कामावर घ्यावे. अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
पूर्वी जसे सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र सर्रास धुम्रपान केले जात असे पण आज असे सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना दिसत नाही कारण केवळ कायद्याचा बडगा नाही तर आता ती आपल्याला सवय लागली आहे. तसेच मास्क लावण्याच्या बाबतीत आपण सवय लावण्याच्या आवश्यकतेवर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.
छोट्या व मध्यम उद्योजकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई
कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघू व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
श्री.देसाई म्हणाले, मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपहारगृहाची सोय देऊ शकतात मात्र छोट्या उद्योजकांकडे कामासाठी येणारे 15-20 हमाल आणि इतर कामगार येतात अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 53 उपहारगृह चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही श्री.देसाई यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.