आरोग्य

लेफ्टनंट जनरल डाॕ माधुरी कानिटकर यांची नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

मुंबई दि-6 : लष्करातील लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज 6 जुलै रोजी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची या रिक्त कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या नवी दिल्ली येथे एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) म्हणून कार्यरत आहेत.

कोण आहेत डाॕ माधुरी कानिटकर?

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील डॉक्टर असून 29 फेब्रुवारी 2020 या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत.त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1960 रोजी झाला. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी पदवी प्राप्त केली. त्यांनी 2017 ते 2019 या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2008 साली त्यांना सर्वोत्तम शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आलेले होते.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रलयाचा धडा घेऊन दूरसंचार तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य सुविधा ग्रामीण-दुर्गम भागांपर्यंत सर्वदूर पोहोचविणे आणि “ई संजीवनी” सारख्या टेलीमेडिसीन योजनांचा वेगवान प्रसार करणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त करून लष्कराच्या कोरोना विशेष कृती गटाच्या प्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी ही विशेष जबाबदारी मोठ्या हिंमतीने पार पाडलेली आहे.

नाशिक येथील या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियमित वयोमानानुसार 10 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाला. त्यामुळे हे पद रिक्त झालेले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. यातून डाॕ माधुरी कानिटकर यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांची कुलगुरूपदी नियुक्त करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.