आरोग्य

लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करा-मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे

कोल्हापूर दि-22 लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करुन नागरिकांना तत्पर, पारदर्शीपणे आणि काल मर्यादेत सेवा मिळवून द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी केल्या.

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले, लोकांना सेवा मिळवून देणे हे शासकीय विभागाचे प्रथम कर्तव्य व जबाबदारी आहे. शासकीय कामकाजाबाबत नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे समाधान व्हावे, या पद्धतीने सर्व शासकीय विभागांनी काम करावे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे काम कौतुकास्पद असून त्यांच्याप्रमाणेच सर्व विभाग प्रमुखांनी लोकाभिमुख होवून सेवा द्यावी. कोल्हापूर जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर असून सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीत देखील अग्रेसर बनण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

श्री शिंदे म्हणाले, या अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व सेवा मुदतीत दिल्या जातात, परंतु, या कायद्याच्या कक्षेबाहेर येणाऱ्या सेवादेखील कालमर्यादेत देण्यासाठी प्रयत्न करावेत. या अधिनियमाच्या कक्षेत अधिकाधिक सेवा घेवून त्या ऑनलाईन उपलब्ध करुन देता येतील का याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, सर्व विभागांनी आपापल्या विभागांतंर्गत देण्यात येणाऱ्या सेवांबाबतचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा. तसेच देण्यात येणाऱ्या सेवांबाबत व्यापक प्रसिद्धी करावी, जेणेकरुन या कायद्याविषयी जनजागृती होईल. नागरिकांना जलद सेवा मिळवून देणे हे आपले कर्तव्य मानून शासकीय विभागांनी काम करावे, असे सांगून ‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ हे आयोगाचे ब्रीद वाक्य असून आपले सरकार महा ई सेवा केंद्रामार्फत जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सर्व सेवा वेळेत मिळवून द्यायला हव्यात. ऑनलाईन सेवेबरोबरच ऑफलाईन सेवादेखील तात्काळ मिळवून देणे गरजेचे आहे. विविध विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक सर्व कार्यालयांनी लावणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांना याबाबत माहिती होईल. कोणतीही सेवा अथवा कागदपत्र मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला त्रासाला सामोरे जावे लागू नये, याची दक्षता सर्व शासकीय विभागांनी घ्यावी, असेही आमदार आबीटकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, लोकसेवा हक्क अधिनियमाचे पालन करुन कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करुन  देण्यासाठी वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. यापुढील काळात अधिकाधिक सेवा ऑनलाईन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, जेणेकरुन कामात अधिक पारदर्शकता येण्याबरोबरच केंद्रस्तरीय नियंत्रण ठेवणे सोयीस्कर होईल.

लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिल्या ‘आपले सरकार’ केंद्रांना भेटी
लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी बैठकीनंतर ‘आपले सरकार’ महा ई -सेवा केंद्रांना भेटी देऊन अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत पाहणी केली. 

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.