वाघाच्या शिकारीचा छडा लागला, पाच आरोपी जेरबंद

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वाघ शिकार प्रकरणी वनविभागाने धडक कारवाई करत आज आणखी चार जणांना अटक केलेली आहे. आतापर्यंत भंडाऱ्यातील वाघाच्या शिकार प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. भंडारा वन परीक्षेत्रातंर्गत येणाऱ्या पलाडी गावाजवळ शेताच्या बाजूला नाल्यालगत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. 28 जानेवारीला नर वाघ रूद्र B-2 मृतावस्थेत मिळताच वनविभागात एकच खळबळ उडाली होती. यानंतर या शिकार प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान आणि प्रचंड दबाव वनअधिकाऱ्यांवर होता. यानंतर वनाधिकाऱ्यांनी अचूक शोध मोहीम राबविली होती. अखेर या वाघाच्या शिकारप्रकरणी अवघ्या चोवीत तासात मजुरीचे काम करणाऱ्या दिलीप नारायण नारनवरे याला अटक करण्यात आली होती. 55 वर्षांच्या दिलीप नारनवरे याला चांदोरीमध्ये राहणाऱ्याला विद्युत तारांच्या साहित्यासह अटक करण्यात आली होती. तर अन्य आरोपी फरार होते. अखेर आता सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे.
शरीरयष्टीने रुबाबदार आणि देखण्या अंदाजे 5-6 वर्ष वयाचा रूद्र B-2 वाघाच्या शिकारीनंतर वन्यजीव प्रेमी संघटनांनी सोशल मिडियावर राज्यभर रोष व्यक्त केला होता. दरम्यान या शिकारीबाबत माहिती देणाऱ्याला वनविभागामार्फत 25 हजाराचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. तसंच सर्व आरोपींना शोधण्यासाचं मोठं आव्हानदेखील समोर होतं. यामुळे भंडारा वनविभाग चांगलाच अडचणीत सापडला होता. विशेष म्हणजे एकीकडे भंडारा विभागाचे उपवनसंरक्षक एस.बी. भलावी यांची सेवानिवृत्ती जवळ असताना वाघाच्या शिकारीची घटना उघडकीस आल्याने त्यांच्यावर सुद्धा प्रचंड मानसिक दडपण होते.
मात्र दबावाखाली असतानाही वनविभागाने तपासकार्यात दाखविलेल्या कार्यतत्परतेने घटनेचा पूर्णतः छडा लागला असून आरोपींना चोवीस तासात अटक करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे. वनविभागाने वाघाच्या मृत्यू प्रकरणात सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये मुख्य आरोपी राजू नारायण नारनवरे ,सुभाष झिटू चाचेरे,चैत्राम गोदरू चाचेरे व विलास किसन कागदे सर्व रा. चांदोरी या शिकारी आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या कडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे आहे. त्यामुळे वाघाच्या शिकार प्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झालेली आहे. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून जेरबंद करण्यात यश आलेलं आहे.