वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधात MPDAची कारवाई करू- अप्पर पोलिस अधिक्षक
भुसावळ : काल बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी चाकूच्या धाकावर धमकी देत काही जणांनी राष्ट्रीय महामार्गावरील पंजाब खालसा हॉटेलमध्ये साहित्याची फेकाफेक करीत हॉटेल चालक सारंगधर महादेव पाटील ऊर्फ छोटू रा.खडका रोड, भुसावळ यांना चाकूच्या धाकावर जीवे ठार मारण्याची धमकी देत गल्ल्यातील सात हजारांची रोकड लांबवून पोबारा केल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडलेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कुविख्यात बाबा काल्यासह सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेली आहे.
चाकूचा धाक दाखवत गुन्हा मागे न घेतल्यास गोळीबार करून जीवे ठार मारेल, अशी धमकी हाॕटेल मालकास देण्यात आलेली होती. या पंजाब खालसा हॉटेलमधील लूट प्रकरणी शेख रीजवान उर्फ बबलू शेख अशपाक रा.मुस्लिम कॉलनी, परवेज हमीद कुरेशी रा. आगाखान वाडा, सय्यद वसीम सय्यद रा.पंचशील नगर , शेख नईम शेख सलीम रा.दीनदयाळ नगर,सर्व रा.भुसावळ आणि समीरउद्दीन अमिनोउद्दीन रा.शनी पेठ, जळगाव यांना खडका चौफुलीवरून तर मुख्य आरोपी आसीफ उर्फ बाबा काल्या असलम बेग रा.अयान कॉलनी, भुसावळ याला मंगळवारी सायंकाळी भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी येथून अटक करण्यात आलेली आहे.याबाबत आज जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी भेट देत पाहणी केली. तसेच वारंवार गंभीर गुन्हे करून दहशत माजविणाऱ्यांविरोधात आणि त्यांच्या टोळीविरोधात एमपीडिए अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.