Crime

विवाहितेने दोन मुलींसह आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ

चोपडा दि:३ दोन चिमुकल्या मुलींसह विवाहित मातेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे उघडकीस आलेली आहे. या घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील बीडगाव येथील विनोद विक्रम बाविस्कर (वय-४०) हा तरूण पत्नी वर्षा विनोद बाविस्कर (वय 35), मुलगी खुशी विनोद बाविस्कर, किर्ती विनोद बाविस्कर, मोनाली विनोद बाविस्कर यांच्यासह वास्तव्याला आहे. बुधवारी २ मार्च रोजी रात्री विनोद याचे आईवडील आणि भाऊ यांच्याशी पैश्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या विषयावरून वादविवाद झाला. यात संतापाच्या भरात विनोद बाविस्कर याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
आपल्या पतीने विषारी औषध प्राशन केल्याचा पत्नी वर्षा बाविस्कर यांना प्रचंड धक्का बसला. या घटनेचा कोणताही विचार न करता पत्नी वर्षा हिने दोन्ही मुली किर्ती आणि मोनाली यांना सोबत घेतले आणि बिडगाव शिवारातील गट क्र.234 मधील इकबाल शहादूर तडवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुदैवाने मोठी मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने ती या घटनेपासून दूर राहिल्याने बचावलेली आहे. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मातेसह लेकरांनी सामुहिक आत्महत्या केल्याची माहिती गावातील पोलीस पाटील रामकृष्ण पाटील यांनी अडावद पोलीस स्टेशनला कळवली. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून तिघांचा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.