आरोग्यनागपूरविदर्भ

शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना उपयुक्त -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना उपयुक्त -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर,दि.21: निरोगी आयुष्य जगण्यासाठी, शारीरिक, आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगसाधना करणे अत्यावश्यक आहे. याबाबतचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे  सांगून सर्वांनी आपल्या व्यस्तदिनक्रमातून वेळ काढून दररोज योग साधना करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार  प्रवीण दटके, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य श्री. अलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, योगाचार्य भारतजी, सरोज गुप्ता यावेळी उपस्थित होत्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरातील 75 ऐतिहासिक स्थळांवर केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. यामध्ये नागपूर येथील कार्यक्रमाचाही समावेश होता. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत यावेळी योगसाधना केली. ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना होती.

योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राष्ट्रसंघामध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार 2015 पासून अनेक देशांमध्ये योग दिवस साजरा होत असून योगसाधनेचे महत्त्व जगभरात पोहचण्यास मदत झाली आहे. विदेशात अनेक ठिकाणी योगशास्त्र शिकविले जावू लागले आहे. दररोज नियमित योगसाधना केल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक संतुलन साधता येते, याचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

दररोज किमान एक तास योगसाधना केल्यास आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. आयुर्वेद, अॅलोपॅथी औषधोपचारापेक्षा योग साधना ही उपयुक्त असून त्यामुळे दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. योगसाधनेतून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे श्री. गडकरी म्हणाले. योग प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांकडून योगाचे निस्वार्थीपणे, निःशुल्क प्रशिक्षण दिले जात असून नागरिकांनी शहरातील बगीचा, मैदानांवर दररोज सामूहिक योगसाधना करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.