शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार

मयुरेश निंभोरे , मो.-9325250723
भुसावळ दि-09/08/2020
कोरोना संसर्ग काळानंतर भारतातीलच नाही तर जगातील शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मोठे बदल घडून येत आहेत. पारंपरिक शिक्षणपद्धत्तीचे स्वरूप बदलत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या माध्यमातून ज्ञानाची आदान प्रदान वाढते आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रचंड प्रगती, माहिती व तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या पारंपरिक भौगोलिक मर्यादा ओलांडण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, तंत्रज्ञ आणि उद्योगांसाठी उपकारक ठरणार आहे. दूरस्थ पद्धततीने शिक्षणच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या माध्यमातून दूरस्थ पद्धतीने यंत्रे सुद्धा संचालित केली जातील. बहुमुखी कौशल्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवत विविध क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवण्याची क्षमता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन तंत्रज्ञानामध्ये आहे हे आज सिद्ध झाले आहे. शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार आहे, म्हणून विद्यार्थी या क्षेत्रातील संधीचा फायदा करून घेतला पाहिजे सोबतच आपले कौशल्य विकसित करावे असे मार्गदर्शन भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या वतीने आयोजित “औद्योगिक क्षेत्रातील संधी” चर्चासत्राचा समारोप करतांना विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी केले.
कोरोनात टेलमेडिसनच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्राचे महत्त्व जगाला पटले:
हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मोबाइल, सॅटलाइट, रीमोट सेन्सिंग, स्वयंमचलित वाहने, कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तविकता, टेलिमेडिसिन ह्या प्रत्येक क्षेत्रात भारताने झेप घेण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या काळात टेलमेडिसनच्या माध्यमातून मोठा सहारा डॉक्टर व रुग्णांना मिळाला आणि टेलिकॉम क्षेत्राचे महत्त्व संपूर्ण जगाला पटले. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ज्ञानाची उपयोगिता आणि उपयोजिता ह्यांचे महत्व आता वैश्विक पातळीवर पटलेले आहे, त्यामुळे ह्या क्षेत्रात मोठ्या मनुष्यबळाची गरज निर्माण होऊ घातली आहे असेही डॉ.कुळकर्णी म्हणाले.
संपुर्ण जग प्रचंड मोठ्या तांत्रिक बदलांच्या उंबरठ्यावर: प्रा.धिरज अग्रवाल
इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्किंग, ऑटोमेशन आणि टेलीकम्यूनिकेशन ही सध्याची सगळ्यात मोठी चलनी आणि तंत्र वाहक क्षेत्रे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या माध्यमातून होणारे संचालन आणि टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील प्रगती येणाऱ्या पिढीचे जीवन सुखकारक करणार आहे. भारतासह संपुर्ण जग, चकित आणि थक्क करणाऱ्या प्रचंड मोठ्या तांत्रिक बदलांच्या उंबरठ्यावर असून, ह्या बदलांना स्वीकारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन उपकरणे आणि तंत्र आपल्यासाठी वरदान आणि सहाय्यकारी ठरतील असे मत प्रा.धिरज अग्रवाल यांनी मांडले. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.