सख्ख्या काकाने तीन वर्षीय पुतण्याला विहिरीत फेकून ठार मारले ?

भडगाव -भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या काकानेच तीन वर्षीय पुतण्याला विहीरीत फेकून जिवे ठार मारल्याची संशयास्पद घटना घडलेली असून भडगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. यामुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडालेली असून ,या निष्पाप बालकाची हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, वडगाव सतीचे येथील दिपक रामदास गायकवाड,त्यांची पत्नी सौ.कांताबाई व आई सिंधुताई हे कुटुंब एकत्रित राहातात.तसेच मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. दिनांक 14 डिसेंबर सोमवार रोजी दिपक हा दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास गावाजवळील शाळेलगत असलेल्या तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता. तेव्हा पत्नी कांताबाई घरीच होती व मुलगा आयुष ( वय 3) वर्षे हा अंगणात खेळत होता. दिपक सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मासेमारी करुन घरी परत आल्यावर त्याला आयुष घरी दिसून आला नाही. त्याने त्याची पत्नी कांताबाई हिला आयुष कोठे आहे असे विचारले असता तो अंगणात खेळत असेल असे कांताबाईने सांगितले, म्हणून रामदास हे आयुषला पाहण्यासाठी अंगणात आला. परंतु आयुष हा अंगणात दिसून न आल्याने त्याने त्याची जवळपास शोधाशोध सुरु केली असता ,तरीही आयुष सापडला नाही. म्हणून दिपकने त्याचे मित्र अंकुश दौलत पाटील, ललित जयसिंग पाटील, दत्तु नारायण ठाकरे यांना सोबत घेऊन आसपासचा परिसर पिंजून शोध घेतला असता मात्र आयुष सापडून आला नाही. यावरून आपल्या मुलाला कुणीतरी पळवून नेले असावे असा संशय मनात आल्याने आयुषच्या वडिलांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठत आयुष हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार भडगाव पोलिसांनी मुलाचा फोटो व वर्णन घेऊन भा.द.वी.कलम 363 प्रमाणे हरविल्याची फिर्याद दाखल करुन घेत, पोलीस निरीक्षक श्री. अशोक ऊत्तेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. भगवान बडगुजर, लक्षण पाटील, गिते व ईश्वर पाटील यांनी आयुषची शोधमोहीम सुरु केली.
हे करीत असतांनाच आयुष हा त्याचा काका निलेश रामदास गायकवाड याच्या सोबत होता. अशी माहिती मिळाल्यानंतर संबधित पोलिसांनी निलेश गायकवाड यास ताब्यात घेतले व विचारपूस सुरु केली अगोदर निलेशने उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर निलेशने गुन्ह्याची कबुली देत ज्या विहिरीत आयुष याला फेकले होते , ती विहीर दाखवली. पोलिसांनी विहिरीत पाहिले असता त्या विहिरीत आयुष हा मृत अवस्थेत आढळून आला. म्हणून निलेश यास तात्काळ अटक करून ताब्यात घेतले आहे. अगदी कमी वेळात योग्य रितीने घटनेचा तपास व आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतल्याबद्दल भडगाव पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.