आरोग्य

सर्व साम्प्रदायिक २५० संतांचे भव्य संमेलन वढोदा येथे संपन्न

फैजपुर:श्री राम मंदिर निर्माण कार्यात भारतातील सर्व जाती-धर्माच्या शेवटच्या घटकाचा सहभाग असावा तसेच सर्वांच्या सहकार्यातून श्री राम मंदिराची वास्तु उभी रहावी असे वढोदा प्र सावदा येथे घेण्यात आलेल्या संत संमेलन प्रसंगी उपस्थित संत महंतांनी विचार व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा विश्व हिंदू परिषद यांच्या दृष्टिकोनातून भुसावळ जिल्ह्यातील यावल, रावेर, भुसावल, बोदवड,वरणगाव, मुक्ताईनगर, जामनेर, शेंदुर्णी या तालुक्यातील संत महंतांचे संमेलन आज श्री निष्कलंकी धाम वढोदा येथे घेण्यात आले. या संमेलनात प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान अंतर्गत संत-महंतांची विचार विनिमय सभा घेण्यात आली. याप्रसंगी निधी संकलन जिल्हाप्रमुख परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज, गुरुकुल संस्थानचे शास्त्री भक्तीप्रकाश दासजी, मुक्ताई संस्थानचे ह-भ-प हरणे महाराज, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ललित भैय्या चौधरी, विश्व हिंदू परिषद भुसावल, जिल्हा मंत्री योगेशजी भंगाळे, श्री नारायण घोडके सर जामनेरचे परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, शास्त्री भक्तीकिशोर दासजी, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी लाहोटी, धर्माचार्य संपर्कप्रमुख ॲडव्होकेट कालिदास ठाकूर, धर्माचार्य महंत योगीराज महाराज, वृंदावन धाम पाल चे शिव चैतन्य महाराज, नवनीत चैतन्य महाराज, श्रीराम मंदिर संस्थान कुसुम्बाचे भरत दासजी महाराज, हभप नितीन महाराज आदी संत- महंतांसह सुमारे अडीचशे संत-महंत महाराज उपस्थित होते.
यावेळी मुक्ताई संस्थानचे हभप हरणे महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, श्रीराम मंदिरासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. आपण भाग्यवान आहोत कि या कार्यात आपल्याला सहभागी होता येत आहे. आपण सर्वांनी 100% हिंदू कुटुंबापर्यंत पोहोचून मंदिरासाठी यथोचित निधी संकलन करायचा आहे. मंदिर हे एका व्यक्तीचे नसून आपल्या सर्वांचे असल्याची भावना प्रत्येकाच्या मनी निर्माण व्हावी हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. भुसावळ येथील नारायण घोडके सर यांनी श्रीराम मंदिर निर्माण वास्तु बद्दल सर्व विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
आजच्या संत संमेलन प्रसंगी सर्व संतांची यथोचित उपस्थिती हीच मंदिर निर्माण झाल्याची प्रचिती असल्याचे सतपंथ चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. एखाद्या कार्यक्रमासाठी महाराजांची तारीख घेताना अनेकांना कसरत करावी लागते मात्र आज एकच तारीख आणि सर्व संतांची उपस्थिती हाच श्री रामरायाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभाव एकत्र येऊन त्यांनी केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्व हिंदूंनी संघटित व्हावे, हिंदूंवर होणारे वेगवेगळ्या प्रकारच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे तसेच श्रीरामाचे चरित्र, उत्सव, परंपरा, चालीरीती वर अंधश्रद्धा म्हणून वेळोवेळी आक्रमण होत आहे. त्यासाठी सर्व धर्माचार्य यांनी एकत्रित होणे संघटीत होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यातून एक वेळा जिल्ह्यातील सर्व धर्माच्या संत महंत यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना करताच सर्वांनी एक मताने होकार दिला. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील संतांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. आपण धनसंचय करून ठेवलेल्या धनाला चोराने चोरून नेण्यापेक्षा राम मंदिर निर्माणासाठी दान करावे तसेच आपल्याकडे दोन चाकी, चार चाकी वाहन असल्यास आपण या निधी संकलन प्रसंगी द्यावी असे समारोप प्रसंगी शास्त्री भक्ती प्रकाश दासजी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित संत महंतासह राम भक्तांनी आपली देणगी जाहीर केली. या संमेलनाला विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंगदल यांच्या रामभक्त स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना विनोद उबाळे तर आभार डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मानले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.