साकेगाव शिवारात रेल्वेखाली तिघांची आत्महत्या

भुसावळ- येथून जवळच असलेल्या साकेगाव येथील दाम्पत्याने आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह जळगाव- भुसावळ डाऊन मेल लाईन वर रेल्वेखाली आत्महत्या केल्याने या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साकेगाव येथील रहिवासी हरीश शिरीष चौधरी (वय 37 ) यांनी आपली पत्नी जयश्री हरीष चौधरी (वय 30) आणि गुंजन या दोन वर्षाच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला.यात त्यांची पत्नी आणि मुलगी जागीच ठार झाले. आज दि- 02/09/2020 रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.या परिसरातून जाणाऱ्या शेतमजूर लोकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तातडीने गावातील लोकांना याबाबतची माहिती दिली. लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असणाऱ्या हरीश चौधरी यांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. हरीश चौधरी हे गंभीर जखमी झालेले होते, त्यांना उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेले होते.परंतु उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हरीष चौधरी हे रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती मिळालेली असून यामुळे साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.